Thursday, January 2, 2025

/

आनंदनगरचा नाला बेकायदेशीर : स्थानिकांचा आरोप अन् विरोध

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आनंदनगर, वडगाव येथील नाला बेकायदेशीर असून मूळ सरकारी कागदपत्रात नोंद नसलेला हा नाला अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत संतप्त आनंदनगर येथील रहिवाशांनी या नाल्याच्या विरोधात आज जोरदार आवाज उठविला. तसेच प्रशासनाने नागरिकांसमोर या नाल्याच्या अस्तित्वा संदर्भातील कागदपत्रे सादर करून त्यांना विश्वासात घेऊनच नाल्याचे बांधकाम करावे अशी मागणी रहिवाशांनी केली.

पावसाळ्यात निर्माण होणारी पूरसदृश्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी महापालिकेकडून आनंदनगर वडगाव येथे अलीकडे नाला निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी नाल्याच्या जागेत स्थानिक रहिवाशांच्या मालमत्ता येत असल्याने संबंधित अतिक्रमण हटवण्यासाठी नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.

सदर नाला निर्मिती प्रकल्पा अंतर्गत अनेकांच्या बांधकामांवर कुर्‍हाड कोसळणार आहे. या पार्श्वभूमीवर सातबारा, अनगोळ ग्रामीण नकाशा वगैरे सहा अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये आनंदनगर येथील नाल्याची नोंद नसताना आपल्या भागात नाला निर्मितीचे काम केले जात आहे, असा आरोप करत सदर कामाविरुद्ध आनंदनगर वडगाव येथील रहिवाशांनी आज सोमवारी जोरदार आवाज उठविला. तसेच कुणालाही त्रास न होता या समस्येवर तोडगा काढावा अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्थानिक रहिवासी प्रमुख संतोष पवार म्हणाले की, आमची गल्ली अर्थात आनंदनगर येथील त्रासदायक ठरत असलेला नाला हा बेकायदेशीर असून हा नाला पूर्वीपासून असल्याचे कागदोपत्री पुरावे आम्ही मागितले आहेत. आम्ही जी अधिकृत सरकारी कागदपत्रे मिळवली आहेत त्यामध्ये कुठेही या नाल्याची नोंद नाही आहे. त्यामुळे आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी या नाल्या संदर्भातील कागदपत्रे आम्हा स्थानिक रहिवाशांसमोर सादर करून पुढील कार्यवाही करावी.Anand nagar nala

पूर्वी आमची घरे नसताना आमच्या नावाने सातबारा उतारा असलेल्या खाजगी जागेतून या नाल्याचे सांडपाणी पाणी जात होते. त्यानंतर आम्ही आमच्या मालकीच्या जागेमध्ये घरे बांधली आहे. ही वस्तुस्थिती असताना पूर्वीपासून सरकारी कागदोपत्रांमध्ये अस्तित्वात नसलेला संबंधित नाला बेकायदेशीररित्या अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी आम्ही आमच्या जागेत उभारलेल्या खाजगी मालमत्तेला जेसीबीच्या सहाय्याने हुकूमशाही पद्धतीने सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. याला आमचा तीव्र विरोध असून प्रशासनाने ही कृती तात्काळ थांबवावी.

आम्हा स्थानिक रहिवाशांसोबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. गेल्या तीन वर्षापासून आम्ही ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र स्थानिक जबाबदार लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्हा सर्व रहिवाशांची एकच मागणी आहे आमच्या या भागात संबंधित नाला मुळातच अस्तित्वात नव्हता त्यामुळे जबरदस्तीने तो अस्तित्वात आणला जाऊ नये. त्याऐवजी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जावी. कुणालाही त्रास न होता या समस्येवर तोडगा काढावा, असे पवार यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.