बेळगाव लाईव्ह : देशसेवेची जिद्द आणि स्वप्न उराशी बाळगून, तसेच सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या आपल्या मामाच्या प्रेरणेतून बेळगावच्या कंग्राळी बुद्रुक येथील रोशनी मुळीक या तरुणीने बीएसएफमध्ये झेप घेतली आहे. सैन्यदलाच्या गणवेशातील मामाचा आदर्श नजरेसमोर ठेवून गेल्या दोन वर्षांपासून खडतर मेहनत घेऊन रोशनीने केलेल्या कार्याला यश आले आहे.
कंग्राळी बुद्रुक येथील रोशनी वसंत मुळीक यांचे मूळ गाव ओलमणी (जांबोटी) हे असून ती सध्या कंग्राळी बुद्रुक येथे स्थायिक झाली आहे. महिला विद्यालय इंग्रजी माध्यमात शालेय शिक्षण आणि लिंगराज महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या रोशनीने लहानपणापासूनच सैन्यदलात भरती होण्याचे स्वप्न बाळगले होते.
रोशनीने यापूर्वीही अनेक क्रीडाप्रकारात भाग घेत यश मिळविले आहे. शालेय स्तरापासूनच क्रीडाप्रकारात मिळविलेल्या सुवर्णपदकांमुळे तिची निवड एनसीसी मध्ये झाली. याचप्रमाणे स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्येही रोशनी अव्वल ठरली आहे. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या परेडमध्येही तिने सहभाग घेतला असून राष्र्टीय स्तरावरील कराटे चॅम्पियनशिपमध्येही तिचा सहभाग होता.
सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी बेळगावच्या एस जी आर्मी कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊन खडतर प्रवासानंतर रोशनीने यश मिळविले आहे. तिला कोचिंग सेंटरच्या सर्व प्रतिनिधींचे उत्तम सहकार्य लाभल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल तिचे वडील वसंत मुळीक आणि आई वैष्णवी मुळीक यांनी आपला आनंद गगनात मावेनासा झाल्याचे सांगितले.
‘बेळगाव लाईव्ह’ शी आपल्या यशाबद्दल बोलताना रोशनी मुळीक म्हणाली, आपल्याला या यशापर्यंत पोहोचविण्यात आपले आई, वडील यांच्यासह मामांचा आणि एसजी कोचिंग सेंटरचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीला २ वेळा बीएसएफ मध्ये भरती होण्यासाठी आपण प्रयत्न केले. परंतु आपल्याला यश मिळाले नाही. अखेर एस जी आर्मी कोचिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊन, दोन वर्षांच्या खडतर मेहनतीमुळे आणि सैन्यदलात भरती होण्याच्या जिद्दीमुळे आपण हा पल्ला पार करू शकलो असून ज्या तरुणींना देशसेवेत स्वतःचे योगदान द्यायची इच्छा असेल,
ज्या तरुणींना सैन्यदलात भरती व्हायचे असेल, त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाने मेहनत घेणे तसेच जिद्दीने आपले ध्येय गाठण्याचे स्वप्न बाळगणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.