बेळगाव लाईव्ह : महावविद्यालयीन आठविणींना उजाळा देत जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. जीएसएस महाविद्यालयाला नुकताच स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा प्राप्त झाला आहे.
याबाबतची माहिती माजी विद्यार्थ्यांना व्हावी. या आनंदात सहभागी होण्याबरोबरच जुन्या मित्र मैत्रिणींना महाविद्यालयाच्या आवारात पुन्हा भेटता यावे यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासूनचे आतापर्यंत सर्व आजी – माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
जीएसएस कॉलेजच्या स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 1965 पासून 2024 पर्यंतचे सुमारे 1200 माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक सादरीकरण आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
जीएसएस कॉलेजने स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले. या विशेष प्रसंगी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रसाद पंडित उपस्थित होते.
सुमारे 1200 माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवून आपल्या जुन्या वर्गमित्रांबरोबर गप्पा गोष्टी आणि आठवणींचा आनंद घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थ्यांनी गीते गायली, नृत्य सादर केले, बासरी वादन आणि योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
स्नेहभोजनादरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे किस्से आणि आठवणींना उजाळा दिला. कॉलेजच्या या उपक्रमाने विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांच्यातील बंध अधिक घट्ट केले आणि माजी विद्यार्थ्यांनी जीएसएस कॉलेजबद्दलचा अभिमान व्यक्त केला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि स्नेहभोजनाच्या मधुर क्षणांनी या मेळाव्याला एक वेगळी उंची मिळवून दिली.