बेळगाव लाईव्ह :अनेक दिवसांपासून माध्यम प्रतिनिधींच्या इच्छेनुसार बेळगावात सुसज्ज प्रेस हाऊस बांधण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी येथील विश्वेश्वरय्या नगरमध्ये पत्रकार भवनआणि उद्यान विभाग कार्यालयाच्या इमारतींच्या पायाभरणी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले,प्रेस हाउसच्या बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्यामुळे पत्रकारांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली आहे. तसेच पत्रकार भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक निधी देऊन सुसज्ज प्रेस बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याच ठिकाणी फलोत्पादन विभागाची इमारत बांधून जनतेला चांगली सेवा दिली जाईल. अशा चांगल्या इमारती बेळगावचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे मत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
फलोत्पादन विभागाचे मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन म्हणाले की, बेळगावात जनतेच्या हितासाठी चांगल्या इमारती बांधल्या जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. यातून बेळगाव विकासाच्या वाटेकडे वाटचाल करेल, असे ते म्हणाले. जनतेला चांगली सेवा देण्यासाठी प्रेस हाउस आणि उद्यान विभागाच्या कार्यालयाच्या इमारती या सुसज्ज इमारती असतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक करताना माहिती व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर म्हणाले, पत्रकार भवनाच्या पायाभरणीने माध्यम प्रतिनिधींचे दीर्घकाळचे स्वप्न साकार होत आहे.
याप्रसंगी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ, कित्तूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्ती विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वास वैद्य, उद्यान विभागाचे सचिव डॉ. शामला इक्बाल, उद्यान विभागाचे संचालक डी.एस. रमेश,महापौर सविता कांबळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहसंचालक मंजुनाथ डोलिना, वरिष्ठ सहायक संचालक जडियप्पा गेडलगट्टी, उद्यान विभागाचे उपसंचालक महांतेश मुरगोड आदी उपस्थित होते.
याच प्रसंगी जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी व पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणारे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचा जिल्हा कार्यरत पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप कुरंदवाडे व प्रदेश उपाध्यक्ष पुंडलीक बालोजी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला बेळगाव येथील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.