बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजिण्यात येणाऱ्या महामेळाव्याला कोणत्याही प्रकारे परवानगी देण्यात आली नसून महामेळावा भरविण्यासाठी कदापिही परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांसह पोलीस विभाग किंवा प्रशासनाने महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा भरविण्यासाठी परवानगी दिलेली नाही. समितीच्यावतीने बेकायदेशीर पद्धतीने महामेळावा भरविण्यात आल्यास समितीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने दरवर्षी महामेळावा आयोजिण्यात येतो. आजवर प्रशासनाने महामेळाव्यासाठी परवानगी नाकारलीच आहे. परंतु आपली भूमिका मांडण्यासाठी समितीने महामेळावा यशस्वी करून दाखविला आहे.
गेल्या काही वर्षात समिती नेत्यांवर महामेळाव्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या कोणत्याही गोष्टीला न जुमानता समिती महामेळावा आयोजित करत आली आहे.
यंदाही प्रशासन किंवा पोलीस विभागाने परवानगी दिली नाही, तरीही महामेळावा भरवून यशस्वी करण्याचा निर्धार समितीने केला आहे.