बेळगाव लाईव्ह : बसवन कुडची या गावातील, शेतवाडीतील रस्त्यांची झालेली दुरवस्था, मूलभूत सुविधांचा अभाव, महानगर पालिका व्याप्तीत समाविष्ट होऊनही या भागाचा खंडित झालेला विकास यासंदर्भात प्रशासनाने लक्ष पुरवावे यासाठी आज येथील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
बेळगाव तालुक्यातील बसवन कुडची गावामध्ये सुमारे 500 एकर जमीन आहे. हे गाव महापालिका हद्दीत समाविष्ट होऊन 30 वर्षे झाली असून अद्याप या गावाला कोणत्याही स्वरूपाचे सुधारणात्मक विकास कार्य मिळालेले नाही. कोणत्याही सरकारी योजनेअंतर्गत लाभ मिळालेला नाही.
गावातील सर्व शेतकरी त्यांच्या जमिनीवर अवलंबून आहेत. परंतु, शेतांपर्यंत जाण्यासाठी रस्त्यांचा अभाव असल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्याच्या काळात परिस्थिती आणखीनच बिकट होते. रस्त्यांअभावी शेतकाम करणे, शेतकरी अवजारांची वाहने ने-आण करणे कठीण होत असून यामुळे शेतजमिनींवर विपरीत परिणाम होऊन सुपीक जमिनी नापीक होत आहेत.
शेतात कामे करणे अवघड झाल्याने जनावरांसाठी चार उपलब्ध करणे अडचणीचे ठरत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत बसवन कुडची गावातील शेतकऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन दिले आहे. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
बसवन कुडची गावातील शेतांपर्यंत जाणाऱ्या सर्व सरकारी मार्गांसाठी 8 कि.मी. लांबीचे रस्ते त्वरित मंजूर करून त्या संदर्भातील कामे सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागांना द्यावेत. अन्यथा, बसवन कुडची गावाला ग्रामीण क्षेत्रात पुनः समाविष्ट करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने आग्रह धरू, जर पुढील काळात योग्य ती कारवाई केली गेली नाही, तर गावातील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी बसवन कुडची येथील नगरसेवक बसवराज मोदगेकर, परशराम बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, संजू बडिगेर, संतोष चौगुले, राजु मुतगेकर, कल्लाप्पा बेडका, सुरेश इटगी आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.