बेळगाव लाईव्ह :आनंदनगर, वडगाव दुसरा क्रॉस येथील नाल्याच्या कामाला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी आज मंगळवारी सकाळी आनंदनगर येथे भेट देऊन पाहणी केली.
तसेच तेथील नागरिकांची बैठक घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली. बैठकीतील चर्चेअंती सध्याच्या मोठ्या रुंदीच्या नाल्याला विरोध दर्शवून त्याऐवजी गटर सदृश्य लहान नाला बांधकामास सर्वानुमते संमती दर्शविण्याच्या स्वरूपात यशस्वी तोडगा काढण्यात आला.
वादग्रस्त नाल्या संदर्भातील सदर बैठक आनंदनगर, वडगाव येथील शिव मंदिरामध्ये पार पडली. आनंदनगर, दुसरा क्रॉस परिसरातील गृहिणींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यामध्ये नाला बांधकामाशी सहमत आणि विरोध करणारे अशा दोन्ही बाजूच्या लोकांचा समावेश होता. यावेळी कोंडुसकर यांनी दोन्ही बाजूच्या लोकांचे म्हणून ऐकून घेतले. सदर नाला हा वरच्या अंगाला आठ फुटाचा असून त्याच पद्धतीने संपूर्ण बांधकाम झाले तर खालच्या अंगाला असलेल्या बऱ्याच इमारती व घरांचे मोठे नुकसान होणार असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तेंव्हा सांगोपांग चर्चेअंती नियोजित 8 फुटाच्या नाल्याला विरोध दर्शविण्यात आला. तसेच त्याऐवजी लहान आकाराचा गटार सदृश्य 5 -6 फुटाचा नाला बांधण्यास सर्वानुमते संमती दर्शविण्यात आली.
त्यासाठी बऱ्याच नागरिकांनी नाल्याच्या मार्गात येणारे आपले बांधकाम स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली. या पद्धतीने श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या मध्यस्थीमुळे तब्बल 3 वर्षानंतर वडगाव येथील आनंदनगर दुसरा क्रॉस नाल्याची समस्या अखेर आज निकालात निघाली.
स्थानिकांच्या आग्रहावरून आनंदनगर दुसरा क्रॉस येथे भेट देणाऱ्या रमाकांत कोंडुसकर यांनी बैठकीपूर्वी नाल्याचे उगमस्थान ते शेवट पर्यंतच्या परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नाला बांधकामाशी सहमत आणि विरोध करणारे नागरिक त्यांच्या समवेत उपस्थित होते.
त्यांच्याकडून कोंडुसकर यांनी नाल्या संदर्भातील मते जाणून घेतली. अखेर त्यांच्यामुळे बैठकीच्या माध्यमातून नाल्याच्या समस्येवर तोडगा निघाल्यामुळे परिसरातील नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.