बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामे हाती घेतली जात असतानाच शहरातील प्रमुख मार्गावरील दुभाजकांवर झाडांची रोप लावून वृक्षारोपण ही केले जात आहे. तथापि दरवर्षीप्रमाणे अधिवेशन संपताच या रोपांकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेताना महापालिकेकडून त्यासाठी प्लास्टिक बाटल्या वापरून ठिंबक सिंचनाचा प्रयोग केला जात आहे.
बेळगाव शहरातील दुभाजकांवर लावण्यात आलेली रोपे जगवण्यासाठी महापालिकेने ठिबक सिंचन पद्धती अंमलात आणली आहे. रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये पाणी भरून त्या बाटल्या रोपांजवळ लटकवण्यात आल्या आहेत. पाण्याने भरल्या बाटल्यांना लहान छिद्र पाडण्यात आले असून त्या छिद्रातून सतत पाणी ठिपकत राहिल्यामुळे उन्हातही ते रोप तग धरू शकेल असा महापालिकेचा कयास आहे.
शहरातील सुक्या कचऱ्यातून विलगीकरण केलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा या ठिंबक सिंचनासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवरील दुभाजकांवर सध्या या पाण्याने भरलेल्या बाटल्या लटकवलेल्या दिसत आहेत.
दरवर्षी विधिमंडळ अधिवेशन काळातच दुभाजकांवर रोपे लावली जातात. तथापि अधिवेशन संपताच या रोपांकडे दुर्लक्ष केले जाते. अनेकदा मोकाट जनावरांकडून या रोपांचा फडशा पाडला जातो. अशावेळी महापालिकेकडून त्या रोपांचे संरक्षण केले जात नाही किंवा नुकसान झालेल्या ठिकाणी नवी रोपे लावली जात नाहीत.
मात्र यावेळी महापालिकेच्या नव्या आयुक्त शुभा बी. यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याने दुभाजकांवरील रोपे जगतील आणि अधिवेशन काळात चांगली बहरतील अशी अपेक्षा आहे.