बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या लेंडी नाला फुटल्याने सुमारे ३०० एकर शेतजमिनीला फटका बसला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून यासंदर्भात आज शेतकरी आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती केली.
गेल्या २० वर्षांपासून लेंडी नाल्याची समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. येळ्ळूर रोड, मच्छे आणि लेंडी नाल्याच्या अखत्यारीत येणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक अडचणी भेडसावत असून यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे.
शेतजमिनीत पिकांची लागवड करणेही मुश्किल बनले असून नाल्याच्या पाण्यामुळे शेतजमीन पिकासाठी अपायकारक बनली आहे. यासह शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या नाल्याच्या समस्येत राष्ट्रीय महामार्गामुळे भर पडली असून भूमिगत पाईपलाईन घालून या समस्येवर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून बळ्ळारी नाला आणि लेंडी नाल्याची सफाई झाली नाही. या दोन नाल्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गामुळे अडलेले पाणी नाल्यात अतिरिक्त जमा होत आहे, तसेच पावसाळी दिवसात नाल्याला पूर येण्याचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान घालण्यात आलेल्या ड्रेनेज पाइपलाइन सडल्या असून याचाही फटका नाल्याला बसत आहे. शेतकऱ्यांना गेल्या २४ वर्षांपासून हि समस्या उद्भवत असून किल्ला तलावातील पाणी देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या दिशेने वाहून नाल्यात मिसळत आहे. यंदा उद्भवलेल्या समस्येमुळे नाला परिसरातील भातपिके नष्ट झाली असून जनावरांसाठी मिळणारा चाराही नष्ट झाला आहे. सुहजारो एकर जमिनी शेतीसाठी वापरणे अशक्य झाले असून याची झलक ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही टिपून याच्या क्लिप्स जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या या समस्यांची दखल जिल्हा प्रशासनाने घेऊन तातडीने समस्येवर तोडगा काढावा, झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना १,००,००० रुपये प्रति एकर दराने नुकसान भरपाई दिली जावी, या प्रकरणासाठी तज्ञ अधिकाऱ्यांची एक समिती गठित करावी, जमिनीचे परीक्षण करावे, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शेतकरी नेते नारायण सावंत यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.