बेळगाव लाईव्ह : बेळगाव तहसीलदार कार्यालयातील क्लार्कने तहसीलदारांच्या केबिनमध्ये आत्महत्या केल्याच्या घटनेला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. ताज्या घडामोडीनुसार आत्महत्या करणाऱ्या एसडीसी रुद्रेश यडवन्नावर याने व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज टाकत आपल्या मृत्यूस तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि बेळगावच्या एका मंत्र्याचा स्वीय सहाय्यक (पीए) कारणीभूत असल्याचे नमूद केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लिहिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरील मेसेज मध्ये बेळगावचे तहसीलदार आणि मंत्र्यांचे पीए, आणि तहसीलदार कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकारी यांची नावे त्यांनी आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवली आहेत त्यामुळे या अनुषंगाने देखील पोलीस तपास करणार आहेत.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदार आणि मंत्र्यांचे पीए यांनी मुद्दाम जाणीवपूर्वक बेळगाव कार्यालयातून सौंदत्ती येथे बदली केल्यामुळे रुद्रन्ना याला मोठा मानसिक त्रास झाला होता. मंगळवारी सकाळी त्या मानसिक त्रासातूनच ते कार्यालयात दाखल झाले असावेत त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तहसीलदार कार्यालयातील रुद्रेश यडवन्नावर या द्वितीय दर्जा कारकुनाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे . कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट दिली.
आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे . घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली आहे गरज भासल्यास तहसीलदार कार्यालयातील सीसीटीव्ही देखील तपासले जातील आणि सर्व अँगलनी चौकशी करूनच एका निष्कर्षावर पोचणार आहोत. अद्याप डेथ नोट आम्हाला मिळाली नाही मात्र व्हाट्सअप वर मेसेज करण्यात आला आहे त्याची देखील चौकशी करण्यात येणार आहे अशी माहिती डीसीपी जगदीश यांनी दिली.