बेळगाव लाईव्ह : गेल्या ६७ वर्षांपासून महाराष्ट्रात जाण्याची तीव्र लोकेच्छा प्रकट करत रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांनी यंदाही आपला मराठी बाणा, स्वाभिमान आणि महाराष्ट्रात जाण्याचा अट्टहास निषेध मोर्चाच्या माध्यमातून कर्नाटकी प्रशासनासह केंद्रालाही दाखवून दिला. गेल्या ६७ वर्षात सीमालढ्यात उतरणारी हि चौथी पिढी असून आजच्या निषेध फेरीत युवकांचा सहभाग लक्षणीय होता.
धर्मवीर संभाजी उद्यानापासून सुरु झालेल्या निषेध मोर्चात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तरुणांनी हा मोर्चा यशस्वी केला. यादरम्यान प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, मराठी युवकांनी मराठी भाषेसाठी दिलेले प्राधान्य. नुकतेच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
यानंतर महाराष्ट्रसह देशभरातील अनेक तज्ज्ञ मंडळी यावरील कारणमीमांसा आणि उहापोह करण्यात व्यस्त असतानाच सीमाभागातील तरुणांनी मात्र आपल्या मातृभाषेला अभिजात दर्जा देत आपला लढा मराठीचाच गेल्या ६७ वर्षांपासून सुरु आहे, आणि ६७ वर्षांपासून या लढ्याची धग प्रखरच आहे, हे दर्शवून दिले. गेल्या ६७ वर्षांपासून हा लढा जिवंत ठेवला हि बाब मात्र सीमाभागातील तरुणांच्या मनात रुजली गेली आहे हे निश्चित आहे.
जेव्हा एखादा लढा युवकांच्या हाती येतो तेव्हा तो लढा सुटल्याशिवाय राहात नाही हे आजवरच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. आजच्या निषेध मोर्चात ८० टक्के सहभाग तरुणांचा होता. यामुळे सीमालढा नव्या पिढीकडे संक्रमित होत आहे हे सिद्ध झाले असून सीमालढ्यासाठी हि जमेची बाब आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर लादण्यात येणारी कन्नडसक्ती आणि याच्या दबावाखाली राहणारा मराठी तरुण आता आपल्या अस्मितेसाठी रस्त्यावर उतरला आहे. नवी पिढी आपल्या मातृभाषेकडे इतक्या स्वाभिमानाने पाहते, आपळी मातृभाषा जिवंत राहिली पाहिजे, या दृष्टिकोनातून पाहते, अशावेळी नव्या पिढीच्या खांद्यावर जेव्हा मराठीची पालखी येईल, तेव्हा निश्चितच तो सुदिन असेल. केंद्राने अभिजात दर्जा देण्यापेक्षा सीमाभागातील युवकांनी आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिली हि सीमावर्ती भागासाठी अभिमानाची बाब आहे.
काही वर्षांपूर्वी १ नोव्हेंबर रोजी निघणाऱ्या मोर्चामध्ये साधारणतः ५० ते ६५ वयोगटातील नागरिकांचा सहभाग अधिक असायचा. मात्र आजच्या मोर्चाचे स्वरूप पाहता २२ ते २८ वयोगटातील मुलांचा या निषेध मोर्चात अधिक सहभाग असल्याचेच जाणवले.
या मोर्चात महाराष्ट्रात जाण्याची तीव्र लोकेच्छा, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारे प्रशासकीय अत्याचार इतक्या प्रकर्षाने जाणवले कि, याची दखल पंत्रप्रधानांनाही घ्यावी लागेल. युवक एखादा लढा हाती घेतात, त्यावेळी क्रांती घडते हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाची धार युवकांच्या सहभागामुळे आणखीनच धारधार झाली आहे, हे निश्चित आहे.