बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये येत्या 9 डिसेंबर रोजी सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषिकांचा भव्य मेळावा घेण्याचा निर्णय दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला असून याबाबतची रूपरेषा महाराष्ट्र विधान सभेच्या निकालानंतर निश्चित केली जाणार आहे.
कर्नाटक सरकारने गेल्या 2006 पासून बेळगाव येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेण्यास सुरुवात केली होती. तेंव्हापासून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भव्य मेळावा घेऊन कर्नाटक सरकारला मराठी भाषिकांची ताकद दाखविली जाते.
बेळगाव येथे सर्वप्रथम 2006 मध्ये सरकारचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सुवर्ण विधानसौधचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे ते अन्यत्र घेण्यात आले होते. मात्र 2013 पासून सुवर्ण विधानसौध येथे अधिवेशन घेतले जात आहे.
कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे पडलेला खंड वगळता त्यानंतर दरवर्षी सुवर्ण विधानसौध येथे अधिवेशन घेतले जात आहे. या अधिवेशनाला प्रत्त्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेत असते.
राज्य विधिमंडळाच्या बेळगाव मधील यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख काही दिवसापूर्वी निश्चित होत नव्हती. हे अधिवेशन होणार की नाही अशी शंकाही उपस्थित केली जात होती. मात्र गेल्या मंगळवारी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आल्यामुळे आता मराठी भाषिकांच्या मेळाव्याची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि जनजागृती करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर बैठक घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी दिली आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून जनजागृतीवर भर देणे गरजेचे असून मेळाव्याबाबत गावागावात बैठका घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अधिवेशनाची तारीख निश्चित होताच समितीने महामेळाव्याची देखील घोषणा केल्यामुळे युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 1 नोव्हेंबर काळा दिनाच्या कार्यक्रमात देखील युवकांनी उत्साही सहभाग दर्शवला होता. त्याचप्रमाणे महामेळाव्याबाबतही युवकांकडून जनजागृती केली जाणारा असून समिती नेते माजी आमदार मनोहर किणेकर यांनी महामेळावा होणार आहे हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहन केले आहे.