बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या वतीने दरवर्षी सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येते. याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजिण्यात येतो. यंदाही सालाबादप्रमाणे व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यासंदर्भात प्रशासनाला पूर्वकल्पना, निवेदन आणि रूपरेषा ठरविण्यासंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत यंदाचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. अटक झाली तरीही कोणत्याही परिस्थितीत महामेळावा भरविण्यात येईलच, असा निश्चय करण्यात आला.
यावेळी बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले, यंदाही कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात मराठी भाषिकांचा महामेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले असून ९ डिसेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी परिसरातील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवार डी. २८ नोव्हेंबर रोजी आंदोलनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्यासहित मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देण्याचेही ठरविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर घटक समित्यांनी बैठका घेऊन जनजागृती करावी, आणि तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नी जागृत करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
खजिनदार प्रकाश मरगाळे बोलताना म्हणाले, महामेळाव्यासंदर्भात माहिती देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यात आली आहे. महामेळाव्यासाठी त्यांनी पाठिंबा दर्शविला असून सीमाप्रश्नासंदर्भात कणखर भूमिका घेऊ, कोणत्याही पक्षाचे मुख्यमंत्री सत्तेत आले तरी त्यांची भेट घेऊन चर्चा करू असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे ते म्हणाले.
यावेळी शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील बोलताना म्हणाले, सीमाभागात आपण जन्मल्यामुळे संघर्ष हा आमच्या जन्मापासूनच आपल्यासोबत पुजल्याप्रमाणे आहे. आता लढायचे हेच एकमेव ध्येय प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्यासोबत बाळगले पाहिजे. ९ डिसेंबर पासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठी अस्मिता दर्शविण्यासाठी कोणत्याही इतर पर्यायाचा विचार न करता व्हॅक्सिन डेपो मैदान हेच स्थळ महामेळाव्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे मागणी करावी असे विचार त्यांनी मांडले.
बैठकीत सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले. या बैठकीला खानापूर समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, समिती नेते आर. एम. चौगुले, बी. एस. पाटील,ऍड. एम. जी. पाटील, प्रमोद सडेकर, एम. बी. गुरव, अनिल पाटील, डी. बी. पाटील, विकास कलघटगी पियुष हावळ, मोनाप्पा पाटील, मनोहर संताजी, बी. डी. मोहनगेकर, आर. के. पाटील आदींसह समिती नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.