बेळगाव लाईव्ह: एंजल फाउंडेशन आयोजित मंगळागौर व नऊवारी फॅशन शो स्पर्धेला महीलावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
भडकल गल्ली येथील बनशंकरी मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात पारंपारिक वेशभूषेत महिलांनी उपस्थिती दर्शवून फॅशन शो सह मंगळागौरी स्पर्धेतील खेळांचा आनंद लुटला. यावेळी सहभागी स्पर्धक, स्पर्धक समूहाच्या वतीने मंगळागौरीचे विविध खेळ सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
या स्पर्धेविषयी बोलताना एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके म्हणाल्या, महिलांच्या कलागुणांना विशेष वाव देण्याकरिता व आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरवर्षी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने महिला सहभाग घेत असतात. तसेच यावर्षी या स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असल्याचे मीनाताई बेनके यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, या स्पर्धेत सहभाग घेऊन आम्हाला अत्यानंद होत आहे. या स्पर्धेमुळे भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी अधिक ज्ञान मिळत आहे. याचप्रमाणे असे कार्यक्रम नेहमी आयोजित करण्यात यावे अशी इच्छा महिला स्पर्धकांनी व्यक्त केली.
या स्पर्धेत पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी मंगळागौरीच्या खेळांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. मराठी गाण्यांवर आधारित फॅशन शोमध्ये देखील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.