बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर येथील दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी रेल्वे मार्गाच्या सुविधा वाढवण्यासाठी, लोकापूर-धारवाड या मार्गावर प्रार्थमिक सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी चर्चा केली.
२०१९ मध्ये रेल्वे विभागाने या मार्गासाठी प्रथमिक सर्वेक्षण केले होते. त्यावेळी या मार्गावर गर्दीची समस्या नसल्याचे म्हटले होते, तसेच या प्रकल्पाला अनुकूल अहवाल देण्यात आला होता. परंतु, २०२२-२३ मध्ये (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३) सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर येथे आलेल्या भक्तांचा आकडा अत्यंत मोठा होता.
अंदाजे १ कोटी २० लाख भक्तांनी मंदिराचे दर्शन घेतले. यामध्ये १ लाख लोकांना दर्शन मिळाले, पण ३ लाख लोक गर्दीमुळे दर्शन घेऊ शकले नाहीत. त्यामुळे मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या असामान्य वाढली असून, त्या अनुषंगाने रेल्वे मार्गाच्या सुविधांची नितांत आवश्यकता आहे.
त्यामुळे, रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सर्वेक्षणासाठी पुनः मागणी करण्यात आली आहे. त्यावर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या मंत्रालयाच्या पातळीवर या मागणीचा विचार करून लवकरच लोकापूर-सौंदत्ती-धारवाड रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण सुरु करण्याची घोषणा केली आहे.
सौंदत्तीसाठी रेल्वे मार्ग विकसित करण्यासाठी सध्या केंद्र सरकारने कित्येक योजनांच्या माध्यमातून त्या भागात मोठ्या प्रमाणावर विकास कार्य सुरू केले आहे. त्यामध्ये शेकडो कोटींचे अनुदान दिले गेले असून, भविष्यात या भागातील मोठ्या विकासाची अपेक्षा आहे.
तसेच, बेंगळुरू आणि धारवाड दरम्यान सुरू असलेल्या वंदे भारत रेल्वे सेवेचा विस्तार बेळगाव शहरापर्यंत करण्याच्या बाबतीत देखील चर्चा करण्यात आली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला मान्यता देत, लवकरच वेळापत्रकानुसार बेळगाव शहरामध्ये वंदे भारत रेल्वे सेवा सुरू होईल असे आश्वासन दिले.