बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक शिक्षण खाते व क्रीडा विभागातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या 14 व 17 वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग (मुष्ठीयुद्ध) स्पर्धेत स्पृहणीय यश संपादन करून बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रावणाऱ्या मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आज शनिवारी सकाळी जंगी स्वागत करण्यात आले.
विद्यानगर,बेंगळूर येथे गेल्या 20 व 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 व 17 वर्षाखालील मुला मुलींची राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करत मराठा मंडळ खादरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण पदक,1 रौप्य पदक व 1 कांस्य पदक अशा एकूण चार पदकांची कमाई केली. या यशस्वी खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांचे यांचे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले.
त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर मराठा मंडळ शाळेचे शिक्षक शिक्षक आणि पालकांसह खादरवाडी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रथम सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे खादरवाडी ग्रामस्थ राकेश पाटील, रमेश माळवी, मनोज पिंगट, आणि राहुल शिवनगेकर यांच्या हस्ते पुष्पहार व भगवा फेटा घालून स्वागत केले.
तसेच गावातील महिलांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे औक्षण करून मिठाईने त्यांचे तोंड गोड केले यावेळी उपस्थित सर्वांनी खेळाडू व प्रशिक्षकांना आगामी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मुष्टीयोध्यांमध्ये कु. प्रताप शिवनगेकर 40 किलो (सुवर्ण), कु. मिझान सौदागर 60 किलो(सुवर्ण), कु. सेजल कांगले 70 किलो (रौप्य) आणि कु. कैफ धामणेकर 38 किलो (कांस्य) यांचा समावेश आहे. रेल्वे स्थानकावरील स्वागताप्रसंगी खादरवाडी ग्रामस्थ व शेतकरी संघटनेचे राकेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून मुलांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर शाळेचे क्रीडा शिक्षक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै. अतुल शिरोले यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या संस्थेच्या सन्मानीय अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) यांचे कायम प्रोत्साहन असल्यामुळेच राज्यस्तरीय स्पर्धेत आम्ही यशस्वी होऊ शकलो असे सांगून शिरोले यांनी आभार प्रकट केले. तसेच पुढील वर्षी मराठा मंडळचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील देशाचे प्रतिनिधित्व करतील असा विश्वास व्यक्त केला.
उपरोक्त यशस्वी खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर) व संचालक मंडळाचे प्रोत्साहन तर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू पै.अतुल शिरोले व शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री नायर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील यशाबद्दल विजेत्यांचे शाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे.