बेळगाव लाईव्ह : खादरवाडी – बाकाप्पा माळ विक्री प्रकरणी पुढे आलेल्या दलालांनी शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम न भरल्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे.
यामुळे आज ब्रह्मलिंग मंदिरात रात्री ८.०० वाजता शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी गावात मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात गावातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
खादरवाडी – बाकाप्पा माळ विक्री प्रकरणी गावातील शेतकऱ्यांनी दलालांविरोधात रोष व्यक्त करत, ठोस भूमिका घेत, ठाम इशारा दिला असून आजच्या बैठकीत ग्रामस्थ आणि 18 दलालांनी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
जर ते बैठकिला हजर राहिले नाहीत, तर त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येतील आणि त्यांच्या गल्लीत राहून गावकरी स्वतः स्वयंपाक करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
आजची बैठक झाल्यानंतरच खादरवाडी येथील बाकाप्पा माळप्रकरणी पुढील दिशा ठरवली जाईल. दलालांनी आपल्या कृतींमुळे गावकऱ्यांना संकटात टाकले आहे, त्यामुळे आजची बैठक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
बाकाप्पा माळाचा संघर्ष गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी मागील दहा दिवसांपूर्वीच दलालांना संधी दिली होती की, त्यांनी आपले म्हणणे शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना किंवा गावातील प्रमुख नागरिकांना स्पष्ट करावे.
गावभर दवंडी देऊन त्यांना माहितीही देण्यात आली होती. परंतु, दलालांकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने गावातील शेतकरी आणि नागरिकांनी काल निषेध मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला.