बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी आहार सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी आणि उपाहारगृहांमध्ये दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी फूड सेफ्टी ट्रेनिंग अॅण्ड सर्टिफिकेशन (फोस्टाक) प्रशिक्षण व प्रमाणिकरण पत्र सर्व आहार व्यावसायिकांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात बेळगावमध्ये फोस्टाकचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
हॉटेल, रस्त्याच्या कडेला असणारी लहान उपाहारगृहे, ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा, पिझ्झा विक्रेते व स्वीटमार्ट यांसारख्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांनी हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
राज्यभरात 6 लाखांहून अधिक नोंदणीकृत आहार व्यावसायिक असून, सुमारे 14 लाख व्यावसायिक आहार प्राधिकरणाकडे नोंदणी करून व्यवसाय करत आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः कोरोना काळानंतर खाद्यान्न उद्योगाला भरपूर चालना मिळाली आहे. मात्र काही व्यावसायिक आकर्षकता आणि अधिक चविष्ठपणासाठी खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक रंग आणि रसायनांचा वापर करतात.
हे आरोग्याला हानिकारक ठरते व त्यामुळे पोटदुखी, उलटी-जुलाब यांसारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या भेसळीला आळा घालण्यासाठी ‘फोस्टाक’ प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे.
खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या ठिकाणांवरील सर्व कामगारांनी किंवा किमान पाच कामगारांनी हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नोंदणी किंवा परवाना मिळवताना फोस्टाक प्रमाणपत्र आवश्यक असेल.
केंद्र सरकार पुरस्कृत प्रशिक्षण संस्थांकडून एक दिवसाचे दर्जेदार आहार प्रशिक्षण घेतल्यानंतर हे प्रमाणपत्र दिले जाईल. जिल्हा व तालुका स्तरावर हे प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, आहार आयुक्त व आहार सुरक्षा अधिकारी पार पाडतील. केंद्र व राज्य सरकारने बेंगळूर येथील ग्लोबल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन या संस्थेला अधिकृत फोस्टाक सेवा देणारी संस्था म्हणून मान्यता दिली आहे.