बेळगाव लाईव्ह : बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी होणार्या आंदोलनाला तालुक्यातील सर्व ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे हे आंदोलन यशस्वी करून चांगल्या दर्जाच्या रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार तालुका म. ए. समिती आणि युवा आघाडी समिती पदाधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
तालुका समितीच्या कॉलेज रोड येथील कार्यालयात शुक्रवारी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत तालुका समितीने बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यासाठी 11 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार गावोगावी जावून जागृती बैठका घेतल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायतींना पाठिंबा देण्यासाठी निवेदने दिली आहेत.
11 रोजी होणार्या आंदोलनात अधिकाधीक लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तरच त्याची जिल्हा प्रशासन दखल घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपापल्या परिसरातील लोकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन करावे, असे सांगण्यात आले.
बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्ग चांगल्या दर्जाचा होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. त्यामुळे आपली ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले. यावेळी त्यांनी युवा आघाडीकडून होत असलेल्या जागृतीबाबत कौतुक केले.
यावेळी सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील, कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, सहसचिव मल्लाप्पा पाटील, युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, रामचंद्र मोदगेकर, आर. के. पाटील, डी. बी. पाटील, महादेव गुरव, दीपक आंबोळकर, अनिल पाटील आदी उपस्थित होते.