बेळगांव लाईव्ह :जगभरातील ख्रिश्चन 2 नोव्हेंबर हा दिवस सर्व पितरांचा दिवस म्हणून पाळतात. शहर व परिसरातील ख्रिश्चनांनी आज स्मशानभूमीत विशेष प्रार्थना करून हा दिवस साजरा केला. कुटुंबांतील मृतआत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.जु
नी ख्रिश्चन दफनभूमी, गोल्फ कोर्सजवळील नवीन दफनभूमी, शहापूर आदी ठिकाणी विशेष जनसमुदाय व प्रार्थना सेवा घेण्यात आली.
स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आली होती आणि कुटुंबातील जवळच्या आणि प्रिय व्यक्तीला दफन केलेल्या कबरी रंगवून फुलांनी सजवण्यात आल्या होत्या. हनुमाननगर जवळील जुन्या स्मशानभूमीत शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांनी मृतांच्या आत्म्यासाठी प्रार्थना अर्पण केल्या .
सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फा. सायमन फर्नांडिस यांनी आपल्या उपदेशात लोकांना आवाहन केले की, पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसासाठी मृत्यू हा अटळ आहे आणि मृत्यूनंतर माणूस काहीही घेउन जात नाही तर तो आपले सत्कर्म मागे ठेवून जातो ज्यासाठी व्यक्ती लक्षात येते.
“लक्षात ठेवा मृत्यू कसलीही सूचना ना देता येतो आणि आपल्याला या जगातून घेऊन जातो. आम्हाला आमची संपत्ती आणि कमाई सोडून द्यावी लागते , पण आमची चांगली कृत्ये लोकांच्या स्मरणात राहतात, ”फादर फर्नांडिस म्हणाले.
फादर जो डिसोझा, फादर मायकल फर्नांडिस, फादर अल्बर्ट डिसूझा, फादर सिरिल ब्रॅग्स, फादर राजेंद्र प्रसाद, फादर विजय मेंडिथ, फादर मोंटेरो आणि इतर धर्मगुरूही उपस्थित होते.