बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या प्रतिष्ठेच्या बीडीसीसी बँकेच्या नूतन अध्यक्षपदाची निवडणूक ८ ऑक्टोबर रोजी होणार असून, माजी खासदार व सहकारमंत्री अण्णासाहेब जोल्ले यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याला बहुतांश संचालकांनी पाठिंबा दिल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
निप्पाणी, चिक्कोडी तालुक्यातील संचालक निवडीबाबत घडामोडी घडत असतानाच रमेश कत्ती यांनी डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. रिक्त झालेल्या जागेच्या निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले निवडून येणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांनी पुन्हा चिक्कोडीतून भाजपकडून निवडणूक लढवली. भाजपचे माजी खासदार रमेश कत्ती हेही त्यावेळी उत्साही होते. मात्र अण्णासाहेब जोल्ले यांनी रमेश कत्ती यांना मागे टाकत पुन्हा तिकीट मिळवण्यात यश मिळविले.
मात्र, या घडामोडींमुळे अण्णासाहेब जोल्ले यांच्या निवडणूक प्रचारात रमेश कत्ती सक्रियपणे आले नाहीत, यावरून अंतर्गत मतभेदाचे राजकारण सुरु असल्याची चर्चा होती.
यानंतर सुरु झालेल्या नाराजी नाट्याचा परिणाम बिडीसीसी बँकेच्या राजकारणावर दिसून आला आणि अखेर कत्ती यांनी आपला राजीनामा दिला. आता या बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा अण्णासाहेब जोल्ले यांच्यावर सोपविली जाणार हे निश्चित असल्याचे बोलले जात आहे.