बेळगाव लाईव्ह :ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्याच्या रक्षणार्थ आणि वायू व ध्वनी प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांना या दीपावलीत एक तर फटाके फोडू नयेत किंवा ओढायचे असतील तर रात्री 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत फक्त हिरवे फटाके फोडावेत, असे आवाहन कर्नाटक राज्याचे वन, पर्यावरण आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी केले आहे.
दिव्यांचा सण असलेली दीपावली आणि फटाके यांच्यातील पारंपारिक संबंधाची कबुली देत मंत्री महोदयांनी बेंगलोर विकास सौधा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे असे सांगून रसायनयुक्त फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरण हानीवर भर दिला.
अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिपोत्सवावेळी पर्यावरणाचे प्रदूषण नको अत्यंत घातक रसायने नसणाऱ्या हिरव्या फटाक्यांचा वापर करावा याविषयी फटाके विक्रेत्यांकडून ही प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. दुकानदारांनी केवळ पर्यावरणपूरक पर्यायांचा साठा आणि विक्री करण्याचे हमीपत्र दिले पाहिजे. अधिकाऱ्यांना हिरव्या (ग्रीन) फटाक्यांच्या विक्री नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उच्च-डेसिबल (ध्वनी) आणि धूर-उत्सर्जक फटाक्यांना बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची माहिती देऊन मंत्री खांड्रे म्हणाले की हिरवे फटाके फक्त रात्री 8 ते रात्री 10 दरम्यान वापरले जाऊ शकतात आणि जनतेने या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.
फटाके उडविल्याने अनेक वेळा दुर्घटना घडतात कांही ठिकाणी जीवित हानी देखील झाली आहे. मुलांच्या डोळ्यांना दुखापती झाल्याच्याही घटना सातत्याने घडतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.