बेळगाव लाईव्ह:व्यापार परवाना देण्याचा अधिकार आयुक्तांकडून काढून आरोग्याधिकार्यांना देण्याचा निर्णय आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला. तर यावर्षी व्यापार परवान्यातून 4 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ठही देण्यात आले.
महापालिका स्थायी समिती सभागृहात गुरूवारी श्रीशैल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य आणि शिक्षण स्थायी समिती बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी व्यापार परवाना देण्यासाठी आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांना अधिकार देण्यात यावेत. गेल्या काही महिन्यांपासून आयुक्तांकडून व्यापार परवान्यांना मंजुरी देण्यात येत होती. त्यामुळे एक व्यापार परवाना देताना वेळ जात होता. त्याचा परिणाम कामकाजावर झाला आहे.
यंदा आतापर्यंत केवळ 53 लाख रुपयांना महसूल यातून मिळाला आहे. त्यामुळे व्यापार परवाना आरोग्याधिकार्यांकडून देण्यात यावा, असा ठराव करण्यात आला. शिवाय यावर्षी चार कोटी महसुलाचे उद्दिष्ठ असून त्यापैकी दोन कोटी रुपयांची वसुली डिसेंबर अखेर करण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या.
महापालिकेच्या राखीव निधीतून अनुसुचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यासाठी निविदा मागवण्यात यावी. अर्जांची छाननी करून लॅपटॉप महापालिकेकडून वितरीत करण्यात यावेत. दिव्यांगांना खेळाचे साहित्य देण्यासाठी अर्ज मागवण्यात यावेत, असे सांगण्यात आले. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा. मोकाट जनावरांमुळे लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे जनावर मालकांवर कारवाई करण्यात यावी, असेही सांगण्यात आले.
बैठकीला राजू भातकांडे, दिपाली टोपगी, माधवी राघोचे, रुपा चिक्कलदिनी, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी, कौन्सील सेक्रेटरी उदयकुमार तरवाळ, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी, पर्यावरण अभियंते हणमंत कलादगी, आदिलखान पठाण, प्रविणकुमार खिलारे आदी उपस्थित होते.