बेळगाव लाईव्ह:अथणी तालुक्यातील कोहळ्ळी येथील हुलगबाळ रोडवरील आपल्या घरी खेळत असलेल्या 4 आणि 3 वर्षांच्या दोन लहान मुलांचे कार गाडीतून अपहरण करून फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघाजणांवर पोलिसांनी फायरिंग अर्थात गोळीबार करून अपहृत मुलांची सुखरूप सुटका केल्याची घटना काल आज शुक्रवारी पहाटे घडली.
सध्या सुरक्षित असलेल्या अपहृत भावंडांची नावे स्वस्ती देसाई आणि वियोम देसाई अशी आहेत. नंबर प्लेट नसलेल्या कार गाडी मधून मुलांचे अपहरण केल्याची घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मुलांचे वडील विजय देसाई यांनी सांगितले की, काल गुरुवारी ते आणि त्यांची पत्नी कामावर होते. त्यावेळी मुलांची आजी घरात एकटीच असताना अपहरणाची घटना घडली. मुलांच्या पालकांनी अथणी पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील आणि इतर कांही लोकांमधील आर्थिक वादातून मुलांचे अपहरण झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
काल अपहरणाची घटना घडल्यानंतर आज शुक्रवारी पहाटे पळवलेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कारगाडीतून कोहळ्ळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी संशयावरून कार गाडी अडवली.
तेंव्हा अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार अडविल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला.
पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यापैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्या दोन अजान मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.