बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव उंबरठ्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आज शुक्रवारी सकाळी सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांसह अधिकारीवर्गासमवेत श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेल्या आदेशानुसार श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन आणि प्रस्थाना वेळी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी रस्त्यांची दुरुस्ती, रस्त्यावर आडव्या येणाऱ्या झाडाच्या फांद्या हटवणे, खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा व्यवस्थित करणे वगैरे कामे महापालिकेसह संबंधित खात्यांनी हाती घेऊन जवळपास पूर्ण केली आहेत.
सदर कामे व्यवस्थित झाली आहेत की नाही? याची शहानिशा करण्यासाठी महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आज शुक्रवारी सकाळी श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाचा पाहणी दौरा केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या नगरसेवकांसह महापालिका आयुक्त व संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते. सदर पाहणी दौऱ्याला आज शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास समादेवी गल्ली येथून प्रारंभ झाला.
त्यानंतर धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे कपिल तीर्थ अर्थात कपिलेश्वर तलावापर्यंतच्या श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची महापौर व उपमहापौर आणि पाहणी केली. यावेळी कांही ठिकाणी शिल्लक असलेले रस्त्याच्या पॅचवर्कचे काम त्वरेने पूर्ण केले जावे अशी सूचना महापौरांनी संबंधित अभियंत्यांना केली.
हेस्कॉमशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण करून गणेशोत्सव काळात वीज पुरवठा, प्रकाशझोताचे दिवे वगैरे संदर्भात कोणतीही समस्या निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जावी, अशी सूचनाही महापौर व उपमहापौरांनी केली. पाहणी दौऱ्यादरम्यान नगरसेवकांनीही कांही सूचना केल्या.
आजच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महापौर कांबळे आणि उपमहापौर चव्हाण यांच्या समवेत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, बेळगाव स्मार्ट सिटी लि.च्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बसवराज मोदगेकर, संतोष पेडणेकर आणि सिद्धार्थ भातकांडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी,
हेस्कॉमचे अधिकारी, अभियंता तसेच सत्ताधारी आणि विरोधी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा आजचा श्री गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीचा हा पाहणी दौरा संबंधित मार्गावरील साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.