बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने शहापूर येथे तयार केलेल्या रस्त्याची 23 गुंठे जागा मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून प्रांताधिकारी व महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार भूमी अभिलेख कार्यालयाकडून काल गुरुवारपासून त्या जागेच्या सर्वेक्षण व आरेखनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोड (धारवाड रोड) पर्यंतच्या या रस्त्याच्या भरपाई प्रकरणी गेल्या मंगळवारी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात झालेल्या सुनावणीनंतर महापालिका आयुक्त प्रांताधिकारी व स्मार्ट सिटी विभागाकडून तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
या दाव्याची पुढील सुनावणी सोमवारी 23 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याआधी जागा मूळ मालकाकडे हस्तांतरित करावी लागणार आहे. त्यासाठी गेल्या बुधवारी महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी व स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालिका अफ्रिन बानू बळ्ळारी यांच्यात अनौपचारिक बैठक झाली होती. त्या बैठकीत रस्त्याचे सर्वेक्षण व आरेखन करण्याचा निर्णय झाला होता.
सर्वेक्षण व आरेखन पूर्ण होताच पंचनामा प्रक्रिया देखील पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर जागा मूळ मालकाकडे हस्तांतरित करावी लागेल. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आता केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असल्यामुळेच हालचाली गतिमान झाले आहेत.
भूमी अभिलेखा कार्यालयाकडून याचिकाकर्ते बी. टी. पाटील यांची नेमकी किती जागा रस्त्यासाठी घेण्यात आली आहे? त्याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार त्यांची जागा निश्चित करून तेथे आलेखन करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्या शनिवारी संबंधित 23 गुंठे जागा मूळ मालकाकडे हस्तांतरित केली जाण्याची शक्यता आहे.