बेळगाव लाईव्ह:माझ्या अंगावर कांही ईडा-पिडा असेल तर तुझ्या सोबत घेऊन जा आणि मला निरोगी कर असे मागणे मागतो हो.. अशी प्रार्थना करत विसर्जन मार्गावर झोपलेल्या आबाल वृद्धांना ओलांडून जात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात श्री गणेश मूर्तींचे सामूहिक विसर्जन करण्याची पूर्वापार आगळी परंपरा खानापूर तालुक्यातील कापोली गावात आज देखील श्रद्धेने जपली जाते.
खानापूर तालुक्यातील कापोली गावात घरगुती श्री गणेश मूर्तींचे सामूहिकपणे आगळ्या पद्धतीने विसर्जन करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात आहे.
या परंपरेनुसार आपले कल्याण व्हावे यासाठी गावातील आबालवृद्ध विसर्जनासाठी नेण्यात येणाऱ्या मूर्तींच्या मार्गावर पहुडतात. त्यानंतर जमिनीवर झोपलेल्या या भक्तांना ओलांडत गावातील प्रत्येक घरगुती श्रीमूर्तीचे भक्तीभावाने विसर्जन केले जाते.
भक्तांना ओलांडून जात असताना “माझ्या अंगावर कांही ईडा-पिडा असेल तर तुझ्या सोबत घेऊन जा आणि मला निरोगी कर असे मागणे मागतो हो” अशी प्रार्थना विघ्नहर्ता श्री गणेशाकडे केली जाते. अत्यंत श्रद्धेने दरवर्षी ही पूर्वापार परंपरा पार पाडली जाते. कापोली गावातील सर्व घरगुती गणपतींचे एकाच दिवशी म्हणजे सातव्या दिवशी सामूहिक विसर्जन केले जाते हे विशेष होय.
दरवर्षीप्रमाणे काल शुक्रवारी कापोली गावात घरोघरी विधिवत पूजा आणि आरती करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत श्रीमूर्ती वाजत गाजत तलावाच्या दिशेने नेण्यात आल्या.
त्यानंतर शिवारातून तलावाच्या दिशेने जाणाऱ्या विसर्जन मार्गावर झोपलेल्या अबालवृद्धांना ओलांडत जड अंतकरणासह भक्तीभावाने श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी तलावाच्या काठावर संपूर्ण गाव लोटला होता.