belgaum

हसतमुख आणि प्रेमळ व्यक्तिमत्व हरपले

0
440
 belgaum

बेळगाव :आयुष्याच्या प्रवासात काही माणसे स्वतः चंदनासारखी झिजतात, पण आपल्या अस्तित्वाचा सुगंध संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात दरवळत ठेवतात. चव्हाट गल्ली, बेळगाव येथील शहापूरकर घराण्याचे ज्येष्ठ सुपुत्र आणि सध्या चन्नमा नगर येथील प्रतिष्ठित नागरिक कै. वसंत जोतिबा शहापूरकर (वय ७७) हे असेच एक शांत, संयमी आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. १३ जानेवारी २०२६ रोजी त्यांचे निधन झाले आणि एका मार्गदर्शक पर्वाचा अंत झाला.

वसंतराव यांचा जन्म चव्हाट गल्लीतील शहापूरकर कुटुंबात झाला. बालपणातच पित्याचे छत्र हरपले, तरीही त्यांनी डगमगून न जाता आपल्या बंधूंच्या साथीने जिद्दीने आणि कष्टाने दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे उद्यमबाग येथील ‘प्रभात फाउंड्री’ मध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा बजावली. या संपूर्ण खडतर प्रवासात त्यांना पत्नी श्रीमती वसुधा शहापूरकर यांनी मोलाची साथ दिली.

वसंतराव यांनी आपल्या दोन्ही मुलांवर उत्तम संस्कार केले. त्यांचा मोठा मुलगा प्रशांत यांनी भारतीय सैन्यातून देशसेवा केली आणि निवृत्तीनंतर सध्या ते केईबी मध्ये कार्यरत आहेत. धाकटा मुलगा प्रमोद हे आपल्या वडिलांचा दुग्ध व्यवसायाचा वारसा पुढे चालवत आहेत, सोबतच फोटोग्राफी आणि स्वतःच्या वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.

 belgaum

वसंतराव यांनी आपल्या सुनांनाही मुलीप्रमाणेच प्रेम देऊन कुटुंबात मायेची सावली धरली. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत आणि सदैव हसतमुख होता. चव्हाट गल्ली असो वा चन्नमा नगर, ते सर्वांचे लाडके होते. त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण शहापूरकर परिवार आणि मित्रमंडळी दुःखी झाली आहे. शरीराने ते आज आपल्यात नसले, तरी त्यांनी दिलेली शिकवण आणि संस्कारांचा आशीर्वाद कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहील.

“असा देह लाभावा, देहाचा चंदन व्हावा, आयुष्य संपले तरी, सुगंध दरवळत रहावा…” या शब्दांप्रमाणेच वसंतराव यांच्या आयुष्याचा सुगंध त्यांच्या आठवणींच्या रूपाने सदैव दरवळत राहील. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती आणि सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.