बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारच्या सचिवालयाने राज्यातील कांही अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या असून बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख राहिलेले विद्यमान अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्यावर गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून समकालिक जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राज्याचे गुप्तचर विभाग अतिरिक्त पोलीस महासंचालक के. व्ही. शरथ चंद्रा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत त्यांची उमेश कुमार यांच्या जागी भरती विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
याबरोबरच के. व्ही. शरथ चंद्रा हे अतिरिक्त महासंचालक आणि वाहतूक व रस्ते सुरक्षा आयुक्त म्हणून आलोक कुमार यांच्या जागी समकालिक जबाबदारी सांभाळतील. त्याचप्रमाणे के. व्ही. शरथ चंद्रा यांच्या बदलीमुळे त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांची गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तथापि अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त पदाची समकालीक जबाबदारी त्यांच्याकडेच असणार आहे. हा बदलीचा आदेश कर्नाटक सरकारच्यावतीने कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा (सेवा -4) विभागाचे अवर सचिव नागाप्पा एस. परीट यांनी जारी केला आहे.