बेळगाव लाईव्ह :दीड दिवस, पाच आणि सात दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर आता समस्त बेळगावकरांच्या नजरा उद्या मंगळवारी होणाऱ्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागल्या आहेत.
हा शतकोत्तर परंपरा लाभलेला ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी व बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत असून पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवला जाणार आहे. श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी तब्बल 3 हजारहून अधिक पोलिस सज्ज झाले आहेत.
शहरातील सार्वजनिक श्री गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी असून दुपारी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. बेळगावातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक ही दिवशी दुपारपर्यंत चालत असल्यामुळे ती सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व ती दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी पोलीस अधीक्षक दर्जाचे 4 अधिकारी, पोलीस उपअधीक्षक दर्जाचे 30, पोलीस निरीक्षक दर्जाचे 17 अधिकारी तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 3000 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तलाव अशा आवश्यक सर्व ठिकाणी 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गाकडे जाणारे रस्ते बंद करून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग दिला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक मार्गातील बदला संदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून लवकरच पत्रक काढण्यात येणार आहे.
दरम्यान उद्याच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, राखीव पोलीस दल आणि ब्लॅक कमांडो यांच्या उपस्थितीत चार दिवसांपासून शहरात पथसंंचालनं सुरू आहेत. कायदा हाती घेणाऱ्या किंवा अनुचित प्रकारात सक्रिय असलेल्यांमध्ये जरब निर्माण व्हावी हा या पथसंचलनांचा उद्देश आहे. त्यानुसार काल रविवारी देखील पोलीस दलाने विसर्जन मिरवणूक मार्गावर भव्य पथसंंचलन काढून शक्ती प्रदर्शन केले.
पथसंचलनाच्या अग्रभागी पोलीस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केवळ शहरच नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यातून बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी व पोलीस पथसंचलनात सहभागी होते.