Friday, September 27, 2024

/

सण-उत्सवाच्या अवडंबरात दिखाऊपणाला वाव!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : हिंदू धर्मात अनेक सण, उत्सवांची परंपरा आहे. हि परंपरा पूर्वापार चालत आली आहे. मात्र अलीकडे या सर्वच गोष्टीचे अवडंबर माजवून याचा दिखावा करण्यात सर्रास प्रत्येकजण मश्गुल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या पूर्वजांनी सण, उत्सव, कार्यक्रम या सर्व गोष्टी या एका विशिष्ट उद्देशाने सुरु केल्या. मात्र नेमका हाच उद्देश आता बाजूला सरत असून केवळ स्पर्धा आणि दिखावा यातच प्रत्येकाचा वेळ वाया जात असल्याचे निदर्शनात येत आहे.

प्रत्येक समाजाच्या विशिष्ट चालीरीती आहेत. परंतु मराठा समाजाला लक्षात घेता आपल्या समाजात सर्वाधिक चालीरीती पाळल्या जातात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. वर्षभर साजरे होणारे सण, धार्मिक चालीरीती, यात्रा, उत्सव यामध्ये अक्षरशः मराठा समाज भरडला जात आहे

ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल ते लोक या सर्व गोष्टी सहजपणे करू शकतात. परंतु आर्थिक सधन असलेल्या लोकांना दृष्टीक्षेपात ठेवून अनेक मंडळी स्वतःच्या खिशाला झळ लावून अनेक सण वार करताना दिसून येत आहे. वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या विविध चालीरीतीमुळे अक्षरशः कित्येकजण कर्जबाजारी होताना दिसत आहे. सण – उत्सवाचा उद्देश हा समाजाने एकत्रित येऊन, आनंद साजरा करावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी, यानिमित्ताने व्यवसाय वृद्धिंगत व्हावे, महसूल वाढावा हा असणे गरजेचे आहे.

कोणत्याही चालीरीती, परंपरा पाळताना भीती आणि अंधश्रद्धेपोटी न पाळता श्रद्धा आणि उदात्त हेतूने पाळणे गरजेचे आहे. पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती – परंपरांचे जतन करताना मूळ उद्देश बाजूला होता कामा नये, या चालीरीतींच्या मागे कोणत्या गोष्टींचे सार लपले आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

सध्या सर्वत्र सुरु असलेल्या अवाढव्य आणि दिखाव्याच्या गोष्टींमुळे मूळ उद्देश बाजूला हटत चालला आहे. एकमेकांशी सुरु असलेली स्पर्धा, चढाओढ यामुळे सण – उत्सवाची मजा हरवत चालली आहे. सोशल मीडियावर केवळ आपण काय केलं आणि किती केलं याचा दिखावा करण्यामागे धावणाऱ्या आपल्या समाजाला आता मूळ प्रवाहात आणून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणे गरजेचे आहे. अलीकडे अनेक व्यासपीठावर मान्यवरांकडून अशाच गोष्टींबाबत जागृती करण्यात येत आहे. आपला समाज अशा गोष्टींमध्ये भरडून न जाता, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्टीने पुढे यावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांना आपल्या समाजातील प्रत्येकाने सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देऊन ‘एकमेका करू सहाय्य्य अवघे धरू सुपंथ’ या ब्रीदाप्रमाणेच दिखाऊपणाला फाटा देत नाहक खर्च टाळून योग्यपद्धतीने आर्थिक नोयोजन करणे, तसेच आपल्यासह आपल्या समाजाची प्रगती कशी होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.