बेळगाव लाईव्ह विशेष : भाऊबंदकी – कौटुंबिक विभागणी, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे शेतजमिनीची झालेली फोड, विकासाच्या नावाखाली विकण्यात आलेल्या शेतजमिनी, अमाप पैसा मिळत असल्याने शेतजमिनी विकून बांधण्यात आलेली घरे आणि उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे घरे विकून परागंदा होण्याची वेळ मराठा समाजावर आली असून आता मराठा समाजातील तरुणांनी शिक्षणाची कास धरून उत्तम आणि उज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करणे अपेक्षित आहे.
हळूहळू गाव शहराकडे वळू लागली आहेत. शहरे औद्द्योगिकीकरणाकडे आणि व्यावसायिकतेच्या दृष्टीने नष्ट होऊ लागली आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शहरासह सर्वत्रच घरीही विभागणी छोट्या छोट्या खोल्यांमध्ये झाली आहे. त्यामुळे शहरातील लोक देखील छोटी छोटी घरे परप्रांतीयांना आणि बिल्डर लॉबीला विकायच्या नादात अडकली आहेत. अशावेळी मराठा समाजातील तरुण भरकटत असल्याचे चित्र दिसत असून उत्पन्नाचे साधनच हरवत चालल्याची लक्षणे दिसून येत आहेत.
सध्या सण – उत्सवाचे ‘इव्हेन्ट’ बनविण्याचे ‘फॅड’ रुजू लागले आहे. विविध सण उत्सवांच्या आणि धर्माच्या कचाट्यात अडकलेल्या तरुणांकडून विचित्र चालीरीती रूढ होऊ लागल्या आहेत. या सर्वांच्या मागे लागून मराठा समाजातील तरुण पिढी वाया जात असल्याची चर्चा वडीलधाऱ्या मंडळींमध्ये रंगत चालली आहे.
परंतु स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न ओळखू शकणाऱ्या तरुणांना वडीलधाऱ्यांच्या सल्ला नकोसा वाटू लागला आहे. सण – उत्सव करूच नयेत असे काहीच नाही. परंतु आपण कुठं थांबावं आणि कितपत करावं? याचे भान असणे महत्वाचे आहे. सण – उत्सवांच्या अति आहारी जाऊन मराठा समाज खिसा रिकामा करत आहे. वाया जात असलेला वेळ आणि वाढीव खर्च याचा ताळमेळ न जमल्याने मराठा समाजातील तरुण अधोगतीची दिशेने वाटचाल करत आहेत.
आज अनेक मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत असणारे तरुण हे विविध समाजातील आहेत. परंतु अपवाद वगळता मराठा समाजातील तरुण केवळ हुजरेगिरी आणि मुजरेगिरी करतानाच दिसून येत आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. इतर समाजातील तरुणांची प्रगती पाहता मराठा समाजातील तरुणांची प्रगती हि अधोगतीची दिशेने झपाट्याने जात असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.
जितकी अधोगती मराठा समाजाची होत आहे तितकी अधोगती कोणत्याच समाजाची होत नाही, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. आपली संस्कृती, परंपरा जपण्यासाठी आपण पुढाकार घेणे गरजेचे आहे. परंतु एखाद्या गोष्टीचा अतिरेक न करता सोज्वळ आणि संस्कृतीला साजेशा गोष्टीच करणे अपेक्षित आहे.
आज अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. याचप्रमाणे कायमस्वरूपी असणारे अनेक अभ्यासक्रम देखील सुरु आहेत. मात्र शिक्षणाकडे ओढाच नसलेल्या मराठा समाजातील तरुणांचे याकडे म्हणावे तितके लक्ष दिसून येत नाही. शिक्षणात योग्य प्रगती केली तर पुढील मार्ग सुकर होणार हे निश्चित आहे. आज सरकारी पदावर नोकरी करण्यासाठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन भरतीसाठीही जे निकष ठरविण्यात आले आहेत त्या निकषाच्या आधारे निदान सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मराठा समाजातील तरुणांनी तडफडीने कामाला लागले पाहिजे. मात्र याकडेही मराठा समाजातील तरुणांचे लक्ष नाही. मराठा समाजातील तरुणांची शैक्षणिक गुणवत्ता पाहता पहिल्या यादीतच गळती लागेल, असे चित्र आहे.
मराठा समाजाला अद्याप आरक्षण नाही. आरक्षणासाठी लढा सुरु आहे. मात्र आपल्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून नवनवे प्रयोग करण्यासाठी जी कसब लागते ती कसब मराठा समाजातील तरुणांकडे दिसून येत नाही. काही अपवादात्मक तरुण वगळता सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांचा ओढा धर्म-सण-उत्सव यासंदर्भातील चुकीच्या धारणेतूनच पुढे जात असल्याचे जाणवत आहे. आज अनेक सरकारी योजना अंमलात आल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन आपल्यासह आपल्या समाजाची प्रगती करावी, असे विचारदेखील तरुणांच्या मनात डोकावत नाहीत. मराठा समाजातील तरुण सध्या धर्म-सण-उत्सव या मार्गावर भरकटले असून त्यांना योग्य मार्गावर आणून प्रगतीच्या दिशेने पुढे नेण्यासाठी जाणकार आणि सुजाण तरुणांनी, युवा नेत्यांनी मार्गदर्शन केले, आणि तरुण पिढीने याला सकारात्मक प्रतिसाद दिला तरच मराठा समाजाचे नाव पुन्हा इतिहासाच्या पानावर कोरले जाईल यात शंका नाही.