बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यात 15 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा भाग म्हणून 145 किलोमीटरची मानवी साखळी बनविण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मार्गाची पाहणी करून योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा एक भाग म्हणून, लोकशाही आणि भारतीय संविधानाचे महत्त्व जनतेला जागृत करण्याच्या उद्देशाने उद्या जिल्ह्यातील १४५ कि.मी प्रदीर्घ मानवी साखळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
रामदुर्ग तालुक्यातील सलहळ्ळी ते कित्तूरपर्यंत मानवी साखळी बनविण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी यरगट्टी, हलकी क्रॉस, इंचल क्रॉस, करडीगुद्दी, सालापुर क्रॉस आणि बेळगाव येथे भेट देऊन पूर्व तयारीबाबत सूचना दिल्या.
जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे व पोलीस अधीक्षक डॉ. भीमा शंकर गुळेद यांच्या उपस्थितीत आज मानवी साखळी मार्गाची पाहणी केली. सुरक्षितता, सुरळीत वाहतूक याचा विचार करत वाहतूक व्यवस्थेची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाच्या निर्देशानुसार निर्धारित वेळेत मानवी साखळी बांधून कार्यक्रम यशस्वी करावा, कार्यक्रमात सहभागी होणारे विद्यार्थी, तरुण वर्ग, संस्थांचे सदस्य आणि जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व इतर व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
पोलीस अधीक्षक डॉ.भीमा शंकर गुळेद यांनी मानवी साखळी उभारणीसाठी पुरेशी सुरक्षा व पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लोकांनी कुठे उभे राहावे व इतर बाबींचे मार्गदर्शन करणारे फलक लावावेत, असे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी सांगितले.
यावेळी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दिनेश कुमार, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.