बेळगाव लाईव्ह: नुकसान भरपाईसाठी दोन वेळा जप्तीची कारवाई झाली होती ती टाळण्यात यश मिळवलेल्या महा पालिकेला पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बेळगाव शहरातील शास्त्री नगर हुलबत्ते कॉलनी येथील जांगळे कुटुंबियांना 75 लाख 96 हजार 420 रुपयांची भरपाई देण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली. त्यामुळे महापालिकेला असून तुर्तास जप्तीची कारवाई टाळता आली आहे.
हुलबत्ते कॉलनी येथील रस्ता करण्यासाठी 1988 साली जांगळे कुटुंबियांची 5 गुंठे जागा महापालिकेने घेतली. या प्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेने जांगळे कुटुंबियांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे दुसरे अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने महापालिकेवर जप्तीचा आदेश बजावला होता. त्यामुळे मंगळवारी जांगळे कुटुंबिय वकिल आणि न्यायालयीन बेलिफ यांना घेवून महापालिकेत गेले होते. महसूल उपायुक्तांच्या वाहनावर जप्तीची नोटीस चिकटवून वाहन जप्त करण्याचा प्रयत्न केला. पण, महापालिकेचे कायदा सल्लागार आणि इतर अधिकार्यांनी या कारवाईला विरोध केला होता.
बुधवारी या प्रकरणी न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी महापालिकेच्या वकिलांनी जांगळे कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी सरकारसोबत बोलणी सुरू आहे. सध्या गणेशोत्सव असल्यामुळे आम्हाला वेळ द्यावा, अशी विनंती न्यायालयाला केली.
जांगळे यांच्या वकिलांना महापालिकेला आतापर्यंत अनेकदा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे अधिक वेळ देण्यात येवू नये, असे सांगितले. न्यायालयाने दोन्हा बाजुंचे म्हणणे ऐकून घेवून महापालिकेने जांगळे कुटुंबियांना 27 सप्टेंबरपर्यंत भरपाई द्यावी, असा आदेश दिला.
मागील आठवड्यात बँक ऑफ इंडिया ते ओल्ड पीबी रोड रस्ता रुंदीकरणातील 20 नुकसान भरपाई प्रकरण ताजे असताना ही पाऊण कोटीची नुकसान भरपाई आणि नोटीस जप्ती यामुळे बेळगाव महापालिकेचे बुरे दिन सुरू आहेत म्हणायला काही हरकत नाही.