बेळगाव लाईव्ह :संकेश्वर येथील दूरदुंडेश्वर कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षापासून भरविले जाणारे भाजी मार्केट शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी यापुढे एपीएमसी आवारामध्ये भरविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जाहीर केले आहे.
संकेश्वर येथील दूरदुंडेश्वर कॉम्प्लेक्समध्ये गेल्या 30 वर्षापासून भरविण्यात येणारे बेकायदा भाजी मार्केट बंद करून ते एपीएमसी बाजारपेठेत भरवण्यात यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे काल गुरुवारी संकेश्वरमध्ये मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले होते.
सदर मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर त्या सभेमध्ये जिल्हाधिकारी रोशन बोलत होते. अलीकडे शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांनी दूरदुंडेश्वर कॉम्प्लेक्स मधील भाजी मार्केट बंद करून ते एपीएमसी आवारात भरवण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी त्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मी दिले होते. तथापि गणेश चतुर्थीमुळे सदर समस्या निकालात काढणे शक्य झाले नाही. मात्र आता मी आश्वासनानुसार येथे आलो असून बहुचर्चेत असणारा भाजी मार्केट हा विषय आता संपुष्टात आला आहे.
शेतकऱ्यांच्या वेदना आपण समजून घेतल्या असून उद्या शुक्रवारपासून भाजी एपीएमसी आवारातील मार्केट राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भरवावे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शेतकऱ्यांच्या सभेसमोर स्पष्ट केले. भाजी मार्केटच्या विषयासंदर्भात आपण श्री शिवलिंगेश्वर स्वामीजी यांच्याशी चर्चा केली आहे. शेतकरी हिताचे निर्णय तुम्ही घेऊ शकता असे स्वामीजींनी सांगितले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, तहसीलदार मंजुळा नायक, उपतहसीलदार सी. ए. पाटील, जिल्हा एपीएमसीचे संचालक एम. बी. यबनुर, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेकडो शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नवीन जागेत भाजी मार्केट स्थलांतर होणार असल्याने उपस्थित शेतकऱ्यातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
संकेश्वर येथील खाजगी मार्केट एपीएमसी शासकीय मार्केटमध्ये स्थलांतरित केल्यानंतर बेळगाव येथील जय किसान भाजी मार्केट बाबत काय होणार याची चर्चा सध्या बेळगावात रंगत आहे.