बेळगाव लाईव्ह :हेस्कॉमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाऊस थांबताच विशेष मेहनत घेऊन खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या कोंगळा, गवाळी, पास्टोली परीसरातील विद्युत पुरवठा सुरळीत केल्यामुळे या गावातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
मुसळधार पाऊस, अतिवृष्टीमुळे झाडे पडल्याने तारा तुटून खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या कोंगळा, गवाळी, पास्टोली, परीसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला दुरूस्ती साहित्य घेऊन जाण्यासही रस्ता नव्हता.
मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर नागेश देवलतकर व त्यांच्या सहकार्यानी अतिशय चिखलमय रस्त्यातून महत्प्रयासाने विद्युत पुरवठा खंडित असलेली गावे गाठली व त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरू केला. या कामी संबंधित भागातील ग्रामस्थांनी देखील त्यांना आवश्यक मदत केली.
सदर गावापर्यंत पोहोचण्यासाठी हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागला. दुचाकी देखील जाणे मुश्किल अशा चिखलमय रस्त्यावरून जात त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
या पद्धतीने हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात पोहोचून विद्युत पुरवठा सुरळीत केल्यामुळे कोंगळा, गवाळी आणि पास्टोली ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.