बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मंथन वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने गेल्या फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेत चव्हाट गल्ली येथील मराठी सरकारी शाळा क्र. 5 च्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सुयश मिळविले आहे.
सदर परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मुला मुलींची नावे शुभम गौरव हुल्लोळी (इयत्ता 8 वी), समर्थ पुन्नाप्पा कलखांबकर (इ. 6 वी), शिवम सुभाष राजगोळकर (इ. 6 वी), राशी विनायक पाटील (इ. 5 वी) आणि स्वरा शटुपा हुदलीकर (इयत्ता 4 थी) अशी आहेत. या सर्वांना सेंट्रल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वजीत हसबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर विद्यार्थी -विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य वीज बोर्डाचे निवृत्त अधिकारी श्रीकांत कडोलकर आणि शाळेचे मुख्याध्यापक पी. के. मुचंडीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच परीक्षेचे शुल्क आणि पुस्तकांसाठी माजी प्राचार्य एम. एम. जाधव यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊन यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळवून दिले. उपरोक्त यशाबद्दल संबंधित विद्यार्थ्यांचे शाळेसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आपल्या शाळेतील मुलांच्या यशासंदर्भात बोलताना मराठी मुलांची शाळा क्र. 5 चव्हाट गल्लीचे मुख्याध्यापक पी. के. मुचंडीकर म्हणाले की, भावी आयुष्यात मुलांना ज्या स्पर्धात्मक परीक्षांना तोंड द्यावे लागणार आहे, त्या परीक्षा कठीण जाऊ नयेत. परीक्षेला धैर्याने तोंड देता यावं. यासाठी आम्ही या स्पर्धात्मक परीक्षा आमच्या शाळेत आयोजित केल्या होत्या. महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मंथन फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या आयोजनासाठी श्रीकांत कडोलकर, नाईक तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सहकार्य लाभले. या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची फी भरणे किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य पुरवण्याचे काम रोटरी क्लबने केले आहे.
या परीक्षेत एकूण पाच मुले उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाली आहेत. एवढेच नाही तर एनएनएमएसच्या परीक्षेत देखील राखीव कोट्यातून इयत्ता 8चा शुभम हुल्लोळी हा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. यंदाही आम्ही मुलांना तयार करत असून त्यासाठी सकाळी स्पोकन इंग्लिशचा खास वर्ग घेतला जातो. ज्यामुळे मुलांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती राहणार नाही. गणिताचे वेगवेगळे नियम या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवले जातात. जेणेकरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया मुलं अतिशय उत्तम प्रकारे करू शकतात. मुलांनी त्यात प्राविण्य मिळवल आहे, असे मुख्याध्यापक मुचंडीकर यांनी सांगितले.