बेळगाव लाईव्ह:घर बदललेल्या किंवा भाडोत्री राहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे या सर्वांसाठी राज्य सरकारने ‘गृहज्योती’साठी अर्ज करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून दिली आहे. थोडक्यात भाडोत्री अथवा घर बदललेल्यांना देखील यापुढे गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार आहे.
गृहज्योती योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांना नियमाप्रमाणे विजेचा वापर केल्यास कमी बिल येत आहे. मात्र सरासरी युनिट पेक्षा अधिक विजेचा वापर केला तर वाढीव बिल येते.
राज्य सरकारने लागू केलेल्या या योजनेला वर्षपूर्ती झाली आहे. मात्र कांही अडचणींमुळे ‘गृहज्योती’साठी अर्ज करण्यापासून कांहीजण वंचित राहिले आहेत.
त्यामुळे त्यांना अर्ज करणे सुलभ व्हावे यासाठी श्रावण महिन्याची भेट म्हणून अलीकडच्या काळात भाडोत्री राहणाऱ्या, मात्र सध्या घर बदललेल्या आणि नवीन घर बांधलेल्या ग्राहकांना गृहजोतीसाठी अर्ज करता येणार आहेत. एकंदर विविध कारणे भाडोत्री घर बदलणाऱ्या किंवा नवीन घर बांधणाऱ्या ग्राहकांना अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्या ग्राहकाने गृहज्योती योजनेसाठी अर्ज दाखल केलेला नाही त्यांनी हेस्कॉमच्या कार्यालयात संपर्क साधून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने 200 युनिट पर्यंत मोफत वीज देणार असल्याची माहिती दिली असली तरी हेस्कॉमने गृहज्योती योजना लागू होण्यापूर्वी ग्राहक दर महिना किती युनिटचा वापर करीत होते याची वर्षभराची सरासरी काढून प्रत्येक ग्राहकांसाठी दर महिना युनिट निश्चित केले आहे.
याबाबतची माहिती वीज बिलावर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक आणि माहिती घेऊन विजेचा वापर करणे आवश्यक आहे, अन्यथा ग्राहकांना वाढीव बिल भरावे लागणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.