Saturday, January 4, 2025

/

रस्त्यासाठीचे अनगोळचे आंदोलन आश्वासनानंतर मागे

 belgaum

बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनगोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक ते अनगोळ लास्ट बस स्टॉप गांधी स्मारकपर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्याचा युद्धपातळीवर विकास साधण्यात यावा, या मागणीसाठी स्थानिक संतप्त रहिवाशांनी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी छेडलेले बेमुदत धरणे व रास्ता रोको आंदोलन उद्यापासून कामास सुरुवात करण्याचे आश्वासन मिळाल्याने अल्पावधीत मागे घेण्यात आले.

गेल्या 2022 मध्ये श्री गणेश उत्सवानंतर अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौक ते रघुनाथ पेठपर्यंतच्या सुमारे 120 मीटर अंतराच्या रस्त्याशेजारी खुदाई करून भुयारी गटार बांधकाम करण्यात आले. मात्र या रस्त्याचे पूर्ववत डांबरीकरण करण्यात आले नाही.

त्यामुळे रघुनाथ पेठ मार्गे अनगोळ शेवटच्या बस स्टॉपपर्यंत म्हणजे गांधी स्मारकापर्यंतच्या दुर्दशा झालेल्या या रस्त्याची व्यवस्थित दुरुस्ती केली जावी अशी मागणी गेल्या एक -दीड वर्षापासून सातत्याने केली जात आहे. मात्र या मागणीची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी आज शुक्रवारी सकाळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको व बेमुदत धरणे आंदोलन छेडले.

रस्ता रोकोमुळे धर्मवीर संभाजी महाराज चौकामधील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती. याबाबतची माहिती मिळताच प्रभाग क्र. 52 अनगोळच्या नगरसेविका खुर्शीद मुल्ला यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तसेच त्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर लगेच उद्या शनिवारपासून रस्त्याच्या विकास कामाला प्रारंभ केला जाईल, असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान टिळकवाडी पोलीस ठाण्याचे सीपीआय परशुराम पुजारी, महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अजय चव्हाण व परशुराम यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी सीपीआय पुजारी यांनी आंदोलन करणारे माजी नगरसेवक गुंजटकर व इतरांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्यासाठी त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्याचे विकास काम लवकर पूर्ण होण्यासाठी पोलीस प्रशासन देखील प्रयत्न करेल असे सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या उपस्थित कनिष्ठ अभियंत्यानी आज कंत्राटदार उपलब्ध नसल्यामुळे उद्या शनिवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात करू असे आश्वासन दिले. नगरसेविका आणि अभियंत्यांच्या ठोस आश्वासनानंतर रस्ता रोको आणि धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.Protest मे

आंदोलनाप्रसंगी सकाळी बेळगाव लाईव्हशी बोलताना बोलताना माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी प्रारंभी महानगरपालिकेचा जाहीर निषेध केला. वर्षभरापूर्वी पाईपलाईन घालण्यासाठी या रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. मात्र काम झाल्यानंतर खोदलेली चर व्यवस्थित बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात धुळीने माखलेल्या रस्त्यामुळे या ठिकाणचे रहिवासी दुकानदार आणि व्यावसायिकांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. सदर रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी यासाठी गेल्या 8 महिन्यापासून आम्ही वारंवार निवेदनं देत आहोत. मात्र आमच्या मागणीची आजपर्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. जाब विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. सध्या पावसाचे कारण पुढे केले जात आहे मात्र आता श्री गणेशोत्सव तोंडावर आला आहे हे लक्षात घेऊन तरी सदर रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती करून विकास साधला जावा यासाठी आज आम्ही हे आंदोलन छेडले आहे. अनगोळच्या रहिवाशी, या रस्त्याचा वापर करणारे इतर लोक, वाहने या सर्वांना रस्त्याचा त्रास होऊ नये हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाचे म्हणजे हा रस्ता बसेसचा मार्ग असल्यामुळे मनपा अधिकारी व नगरसेवकांनी आपत्कालीन निधीतून या रस्त्याचे विकास काम करायला हवे होते. मात्र तसे घडले नाही. तेंव्हा आता श्री गणेशोत्सव लक्षात घेऊन सदर रस्त्याचा तात्काळ विकास साधण्यात यावा अशी आमची मागणी आहे, असे माजी नगरसेवक गुंजटकर यांनी सांगितले. आजच्या आंदोलनात माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह राजू पवार, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, गजानन चौगुले, भाऊ पावले, रमेश शिंदे आदींसह स्थानिक रहिवाशी व युवक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.