बेळगाव लाईव्ह :रस्ता बांधकाम प्रकल्पाशी संबंधित भू-संपादनासाठी 20 कोटी रुपये न भरल्याने बेळगाव महापालिकेविरुद्ध कायदेशीर याचिका दाखल करण्यात आली आहे. पैसे न भरल्यामुळे महापालिका अडचणीत आली असून आता त्याना संबंधित जमीन मालकांना पैसे द्यावे लागणार आहेत.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने शहापूरमधील बँक ऑफ इंडिया सर्कल ते जुना पी.बी. रोड यांना जोडणारा नवीन रस्ता बांधल्याने ही समस्या उद्भवली आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपल्या आदेशाद्वारे 30 गुंठे भूखंडाच्या मालकांना 20 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देऊन भू-संपादन प्रक्रिया अनिवार्य केली.
मात्र, महापालिकेने अद्याप ही रक्कम भरली नसल्याने जागेच्या मालकांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. हा रस्ता बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने बांधला असला तरी बांधकामापूर्वी योग्य प्रकारे भू-संपादन करण्यात आले नाही.
थेट जमिनीवर कब्जा करून रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गुंतागुंत निर्माण झाली. रस्त्याच्या कामात थेट सहभाग नसतानाही आता महापालिकेवर 20 कोटी रुपयांचा बोजा आहे.
बँक ऑफ इंडिया सर्कल ते जुना पी. बी. रोड शहापूर या रस्त्यांना जोडणाऱ्या सदर रस्त्यासंदर्भात
न्यायालयाने भू-संपादन प्रक्रिया राबवून नुकसान भरपाई देण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत.
या आदेशाचे पालन न केल्यास बेळगाव महापालिकेवर न्यायालयाच्या अवमानाचा आरोप होऊ शकतो. महापालिकेने भू-संपादनाचा प्रस्ताव सादर केल्यामुळे सरकारही यात सहभागी झाले आहे. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. आता आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिकेला 20 कोटी रुपये न्यायालयात जमा करावे लागणार आहेत.