बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली असून नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मागील वेळी बेळगाव दौऱ्यादरम्यान फ्लाय ओव्हरची घोषणा केल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्यासंदर्भात केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच 4.5 हजार कोटींचा कृती आराखडाही सादर करण्यात आला होता.
या फ्लॉय ओव्हरच्या प्रस्तावावर नवी दिल्ली येथे गेल्या 13 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री गडकरी, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. सदर बैठकीत प्रस्तावावर विस्तृत सखोल चर्चा करण्यात आली. फ्लाय ओव्हरचे काम हाती घेण्याबरोबरच बेळगाव -संकेश्वर 6 पदरी रस्ता, रिंग रोड, हालगा -मच्छे बायपास आणि अन्य कामेही वेळेत पूर्ण केली जावीत, अशी सूचना यावेळी मंत्री गडकरी यांनी केली.
फ्लाय ओव्हर संदर्भात राज्यांमधील राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना करून कार्यवाहीचे आदेश दिले जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकंदर बेळगाव शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिजच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे.
गांधीनगर ते अशोक चौक ते आरटीओ सर्कल ते चन्नम्मा चौक ते राष्ट्रीय महामार्ग (केएलई हॉस्पिटलपर्यंत) अशा सुमारे 4.5 कि.मी. अंतराचा हा फ्लाय ओव्हर असणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्ताव साडेचार हजार कोटींचा असून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून हा फ्लाय ओव्हर उभारला जाणार आहे.