Tuesday, November 5, 2024

/

5 वर्षासाठी एकदाच सर्व परवानग्या द्या -शहापूर गणेश महामंडळाची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना 5 वर्षासाठी एकदाच आवश्यक सर्व परवानग्या देण्याचा विचार केला जात आहे. त्याचे अनुकरण बेळगावमध्ये देखील केले जावे, अशी मागणी शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली.

सदर भेटीप्रसंगी पदाधिकाऱ्यांनी दरवर्षी श्री गणेशोत्सवा दरम्यान उपस्थित होणाऱ्या समस्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. यावेळी दरवर्षीप्रमाणे श्री विसर्जन मिरवणुकीस अडथळा ठरणारे रस्त्यावरील खड्डे बुजवणे, रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा वर ओढणे, रस्त्यात आडव्या येणाऱ्या झाडाच्या फांद्या हटवणे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या.

विशेष करून सार्वजनिक मंडप उभारणीसाठी हेस्कॉम, महापालिका, पोलीस वगैरेकडून परवानगी मिळवण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यासाठी शहरातील सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळांना 5 वर्षासाठी एकदाच आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या दिल्या जाव्यात, अशी विनंती करण्यात आली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सदर विनंतीचा निश्चितपणे विचार केला जाईल. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागण्यांचा देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.Dc bgm

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शहापूर श्री गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी माजी नगरसेवक रमेश सोनटक्की यांनी म्हणाले की, गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने श्री गणेशोत्सवासंदर्भात महामंडळ व शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

मात्र त्या बैठकीत शहापूर विभागातील मंडळांच्या समस्यांवर चर्चाच झाली नाही. त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. यावेळी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे 5 वर्षासाठी एकदाच आवश्यक सर्व परवानग्या देण्याबाबत जो विचार सुरू आहे. ती पद्धत बेळगाव शहरात देखील अंमलात आणावी, अशी प्रमुख मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तेंव्हा त्यांनी या मागणीचा जरूर विचार करू असे आश्वासन दिले आहे अशी माहिती सोनटक्की यांनी दिली.

माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी रस्त्यावरील खड्डे रस्त्यावर आडव्या येणाऱ्या झाडाच्या फांद्या अडथळा ठरणाऱ्या विजेच्या तारा वगैरे नेहमीच्या तक्रारी आम्ही केल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले याप्रसंगी अशोक चिंडक, राजू सुतार, पी. जे. घाडी आदींसह शहापूर विभाग सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अन्य सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.