Monday, December 23, 2024

/

भटक्या जमातीच्या कुटुंबांना रेशन किटचे वाटप

 belgaum

बेळगाव लाईव्ह:इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेची ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या सहकार्याने माडीगुंजी (ता. खानापूर) येथील अतिशय कष्टमय जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त (मंग्यानमारी) जमातीच्या कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य असलेल्या रेशन किटचे वितरण करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला.

खानापूर तालुक्यातील माडीगुंजी या ठिकाणी भटक्या मंग्यानमारी जमातीची कांही कुटुंब बऱ्याच वर्षापासून झोपड्या बांधून रहात आहेत. अत्यंत कष्टमय रीतीने जीवन जगणाऱ्या या भटक्या विमुक्त (मंग्यानमारी) जमातीच्या लोकांची माहीती ‘ऑपरेशन मदत’ ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी काढली. तसेच देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर या तळागाळातील मागासलेल्या भटक्या समाजातील कुटुंबांना मदत करायची ठरवली. त्याप्रमाणे सदर कुटुंबांची ऑपरेशन मदत ग्रूपच्या कार्यकर्त्यांनी चौकशी केली आणि त्यांना मदत देण्याचे कबूल केले. सदर कुटुंबांची परिस्थिती ऑपरेशन मदतचे राहुल पाटील यांनी इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांच्यासमोर ठेवली. तेंव्हा इनरव्हील क्लबने ताबडतोब रेशन किटसाठी पुढाकार घेतला आणि रेशन गोळा करायला मदत केली.

इनरव्हील क्लबमार्फत गोळा केलेल्या या सर्व रेशन किटचे इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मेधा शहा, सदस्य प्रियांका शहा व सपना काजगर तसेच ऑपरेशन मदत ग्रूपचे महेश हेब्बाळकर, बाळासाहेब चापगांवकर, नौशाद व राहुल पाटील यांच्या हस्ते आज वितरण करण्यात आले.Inner wheel

यावेळी मंग्यानमारी जमातीच्या लहान बालकांना मिठाई, खाऊ, बिस्किटे व खजूर वाटण्यात आले. या उपक्रमाप्रसंगी दत्तू निकम, सोनी निकम आदींसह पुरूष मंडळी कामानिमित्त बाहेर गेल्याने गरजू कुटुंबातील लहान मुलं व महिला उपस्थित होत्या.

शेवटी राहुल पाटील यांनी सदर भटक्या कुटुंबातील मुला-मुलींनी जर शाळेत जाऊन शिक्षण घ्यायची तयारी दाखवल्यास त्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक साहित्याची मदत करू आणि कुटुंबांतील सदस्यांना कामेही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन दिले. तसेच पुढील वेळी येताना मुलांना कपडे, मिठाई व खेळण्यासाठी खेळणी घेऊन येऊ, असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.