Friday, November 15, 2024

/

‘त्या’ युवकाने सांगितली आप बिती!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गोव्याहून बेळगावला दुचाकीवरून येणार युवक हालात्री नदीच्या प्रवाहात दुचाकीसह वाहून जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला असून तब्बल १ तास, पाण्याच्या प्रवाहात असलेल्या झाडाच्या फांदीवर आपला जीव मुठीत धरून बसणाऱ्या युवकाने त्यादरम्यान ओढवलेल्या प्रसंगाचा अनुभव ‘बेळगाव लाईव्ह’ सोबत झालेल्या संवादात सांगितला आहे.

भारत नगर वडगाव येथे राहणाऱ्या विनायक जाधव या युवकावर असा प्रसंग ओढवला होता. मात्र केवळ दैव बलवत्तर म्हणून सुदैवानेच या युवकाची सुटका झाली. २०१९ पासून याच मार्गावरून सातत्याने कामानिमित्ताने जाणे येणे होते.

परंतु, जुलै महिन्याच्या मध्यावधीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे हालात्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने येथील प्रवाहात आपण कसे वाहून गेलो हे आपल्या लक्षातच आले नसल्याचे तो म्हणाला. सुरुवातीला साधारण १ ते २ फूट पाणी असल्याने आपण त्याठिकाणी दुचाकी उतरवली. मात्र पुढील ५ मिनिटात पाण्याचा प्रवाह इतका वाढला कि या प्रवाहातून बाहेर निघणे मुश्किल झाले.

आणि प्रवाहासोबत दुचाकीसह आपण देखील वाहू लागलो. साधारण १०० – १५० मीटर पुढे वाहून गेल्यानंतर एका झाडाच्या फांदीचा आधार आपल्याला मिळाला. परंतु याठिकाणी आपल्या बचावासाठी कुणीच नसल्याने आपण आरडाओरड सुरु केली. तब्बल १ तास याचठिकाणी अडकून पडल्याने मनात भीती निर्माण झाली. याचदरम्यान काही युवक या भागातून जात होते. माझा आरडाओरडा ऐकून ते बचावासाठी धावून आले. बचावकार्यासाठी अग्निशमन दलाला त्यांनी पाचारण केले आणि यानंतर माझी या प्रवाहातून सुटका झाली, आणि आपण निश्वास सोडला. या ठिकाणी कोणतिही संरक्षक भिंत किंवा कठडा नसल्याने माझ्या लक्षात आले नाही आणि आधार मिळाला नसल्याने आपण पुढे वाहून गेलो, असे विनायक जाधव ने सांगितले.Vinayak jadhav halatri

आपल्यावर ओढवलेला प्रसंग इतर कोणावरही ओढवू नये यासाठी प्रत्येकाने विशेषतः तरुणांनी अशा ठिकाणी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सध्या सर्वत्र अतिवृष्टीमुळे जलाशय परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला असून अशा ठिकाणी जीवघेणे खेळ, कसरती करू नयेत, असे आवाहनदेखील विनायक जाधव या युवकाने केले आहे.

यासोबतच प्रशासनाने देखील अशा ठिकाणी सूचना फलक लावावेत, धोकादायक ठिकाणी असलेल्या पुलांची उंची वाढवावी, धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात यावेत, असे आवाहनही या युवकाने केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.