बेळगाव लाईव्ह :आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध खात्यांच्या परवानगीसाठी सिंगल विंडो, रस्त्यांची दुरुस्ती, मंडप परिसरातील स्वच्छता, आदिंसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन आज मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगावच्या मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, कार्यकारी अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील व सरचिटणीस महादेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी (डीसी) मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील 11 दिवसांचा श्री गणेशोत्सव येत्या 7 ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुक काढली जाणार आहे. या मिरवणुकीत शहरातील नोंदणीकृत सुमारे 357 गणेशोत्सव मंडळांचा सहभाग असतो.
या मंडळांना विविध कारणास्तव सरकारी खात्यांची परवानगी लागते. सदर परवानगी सत्वर मिळावी यासाठी सिंगल विंडो अर्थात एक खिडकी प्रणाली अंमलात आणली जावी. शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना संबंधित खात्यांची परवानगी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी असणारे हे सिंगल विंडो मंडळांना सहज उपलब्ध व्हावेत आणि सोयीचे पडावेत यासाठी जुनी महापालिका इमारत रिसालदार गल्ली, बेळगाव आणि महापालिका कार्यालय गोवावेस सर्कल या ठिकाणी उपलब्ध करावेत.
यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्डे पडून रस्त्यांची वाताहात झाली आहे. रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्यासाठी कृपया लाल मातीचा वापर न करता पेव्हर्स वापरले जावेत. महापालिकेने शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांचा परिसर स्वच्छ ठेवावा. हेस्कॉमने कोणताही अडथळा निर्माण होणार नाही किंवा धोका संभव होणार नाही या पद्धतीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपांसाठी वीज वाहिन्यांची जोडणी करावी. तसेच शहर आणि उपनगरातील काळोख असणाऱ्या भागात योग्य दिवे (हेवीवॅट फोकस) बसवावेत.
वन खात्याने श्री गणेशोत्सव काळात रस्त्यात आडव्या येणाऱ्या, अडथळा निर्माण करणाऱ्या झाडाच्या फांद्या हटवाव्यात. बेळगावातील श्री गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या उत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक श्री गणेश मूर्ती आणि देखावे पाहण्यासाठी स्थानिकांसह परगावचे भाविक मोठ्या संख्येने बेळगावला येत असतात. तेंव्हा शहरात त्यांच्यासाठी फिरत्या स्वच्छतागृहाची मोबाईल टॉयलेट व्यवस्था केली जावी. त्याचप्रमाणे श्री गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील खुल्या असलेल्या गटारी बंदिस्त केल्या जाव्यात. परिवहन मंडळाने (केएसआरटीसी) आपली बससेवा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवावी. जेणेकरून ग्रामीण भागातून रात्री उशिरापर्यंत गणेश देखावे आणि मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांची चांगली सोय होईल.
याखेरीज श्री गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत शहरातील हॉटेल्स, फूड कॉर्नर, टी स्टॉल वगैरे सर्व व्यवहार रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली जावी. श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी म्हणजे 17 सप्टेंबर 2024 रोजी वनिता विद्यालय ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंत प्रेक्षक गॅलरीची उभारणी केली जावी. ज्यामुळे जनतेला विशेष करून वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना कोणत्याही अडचणी विना एका जागी बसून विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटता येईल.
मूर्तिकारांच्या कार्यशाळेपासून सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडपापर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जावी. जेणेकरून सार्वजनिक श्री गणेश मूर्ती निर्विघ्नपणे मंडपापर्यंत घेऊन जाणे सुकर होईल.
याव्यतिरिक्त हेस्कॉमने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरते मीटर्स देण्याच्या बाबतीत नुकसानभरपाई बंधपत्रची जी अट घातली आहे ती मागे घेतली जावी. कारण नुकसानभरपाई बंधपत्रानुसार विद्युत मीटरचे शुल्क गणेश मंडळाच्या अध्यक्षांच्या घरातील विद्युत मीटरवर हस्तांतरित केले जाईल जे अध्यक्षांच्या खाजगी कुटुंबासाठी ओझे होत आहे, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत. निवेदन सादर करतेवेळी महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्यासह जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, सतीश गोरगोंडा, उपाध्यक्ष सागर पाटील, व इतर उपस्थित होते.