बेळगाव लाईव्ह : शहर आणि परीसरात पावसाचा जोर वाढल्याने बळ्ळारी नाल्याला पूर आला असुन हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच शिवारात पाणी वाढत असुन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी समिती नेमण्यात यावी, तसेच पीक नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बळ्ळारी नाल्याचे पाणी यरमाळ रोड, केएलई रुग्णालय, धामणे रोड, प्रस्तावित बायपास रोडपर्यंत येऊन पोहचले आहे. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे या नाल्याला पूर येऊन हजारो एकर शेती पाण्याखाली गेली होती. यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा २०१९ ची पुनरावृत्ती होत असून नाला परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
गेल्या वर्षी पावसाने मारलेली दडी आणि यंदा अतिवृष्टीमुळे शेतपिकांना बसलेला फटका यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बळ्ळारी नाल्याचा प्रश्न गांभीर्याचा असूनही नाल्याचा प्रश्न सोडवून समस्या मार्गी लावण्याऐवजी रिंगरोड, बायपास चा घाट घालून पुन्हा शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा कुटील डाव आखण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदा वेळेवर मान्सुनला सुरुवात झाल्यापासुन शहर आणि परिसरात पावसाचा जोर कमी होता. त्यामुळे बळ्ळारी नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले नव्हते. त्यामुळे यावेळी भात पिक चांगल्या प्रकारे येईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातुन व्यक्त केली जात होती. रोप लागवडही योग्य वेळेत पार पडली होती.
मात्र गेल्या काही दिवसांपासुन अधिक प्रमाणात पाऊस पडत असून शहर आणि परिसरातुन बळ्ळारी नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. या नाल्याला दरवर्षी पुर येत आहे. तसेच बळ्ळारी नाल्याला पुर आल्यानंतर शिवारात शिरलेले पाणी लवकर कमी होत नाही त्यामुळे भात पिक कुजुन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मागील वर्षी पावसाचा जोर कमी होता. यामुळे नाल्यातील गाळ काढून नाल्याचा विकास करण्याची नामी संधी चालून आली होती. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. नाल्याला जलपर्णीचा वेढा पडला होता. हि जलपर्णी हटविण्यात देखील प्रशासनाने स्वारस्य दाखविले नाही.
परिणामी जलपर्णी न काढल्यामुळेच बळ्ळारी नाल्याला पुर येत असुन सध्या आलेल्या पुराचे पाणी लवकर ओसरले तर कमी प्रमाणात नुकसान होणार आहे. अन्यथा गेल्यावर्षी प्रमाणेच यावेळी भात पिकांचे मोठे नुकसान होणार आहेमी अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.