Friday, January 10, 2025

/

श्रावणाच्या पहिल्याच दिवशी शिवालये गर्दीने फुलली!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हिंदू धर्मातील पवित्र मानल्या जाणाऱ्या आणि धार्मिक महत्व असणाऱ्या श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली असून श्रावण महिन्यात होणाऱ्या श्री महादेवाच्या आराधनेसाठी आज बेळगावमधील अनेक शिवालये ‘हर हर महादेव’च्या गजरात गर्दीने फुलून गेली होती.

श्रावण महिन्यातील पहिला दिवस आणि पहिला श्रावण सोमवार यामुळे शिवभक्तांच्या गर्दीने शिवालये फुलली होती. शहरातील प्रसिद्ध श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. अभिषेक, आरती यासह विविध धार्मिक विधींचे आयोजन करून देवस्थानात श्रावणी सोमवार निमित्त विशेष आरास देखील करण्यात आली होती.

मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून संपूर्ण देवस्थानाला फुलांची विशेष आणि आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. देवस्थान परिसरात करण्यात आलेली आकर्षक रोषणाई आणि फुलांची सजावट भाविकांचे विशेष लक्षवेधून घेणारी ठरली.

बेळगावमध्ये कणबर्गी येथेही श्री सिद्धेश्वर देवस्थान प्रसिद्ध असून अनेक भागातील नागरिकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. बेल, फुले, नारळ यासह पूजेच्या साहित्याचे स्टॉल्स मंदिर परिसरात मांडण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांनी देवदर्शन घेत महिनाभरातील संकल्पही केले.

हिंदू धर्मियांत श्रावण महिन्याला आगळेवेगळे महत्त्व असून या काळात अनेकजण सात्त्विक आहाराबरोबरच काही संकल्पही करतात. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून श्री कपिलेश्वर, श्री सिद्धेश्वर, बसवणं कुडची, काकती, श्री शंभू जत्ती मंदिर, मिलिटरी महादेव, वैजनाथ देवस्थान यासह विविध शिवालयांमधून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

देवस्थानाकडूनही मंदिरांची साफसफाई करून आकर्षक सजावट करण्यात आली होती. हर महादेव, बम बम भोले, जय भोलेनाथ आदी घोषणांनी शिवालयांचा परिसर दुमदुमला होता. शिवनामाचा जयघोष करत विविध भागातील शिवालयांमधून पहिला श्रावणी सोमवार मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला.

आजपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने शहरातील शिवालये भक्तांसाठी सज्ज झाली असून विशेषत: यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारीच होत असल्याने नागरिकांची विविध धार्मिक कार्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्याबरोबरच यंदा भक्तांना पाच श्रावण सोमवार मिळणार असून श्रावणमासात विविध शिवालयांतून पूजा, महापूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक कार्यकर्मांची रेलचेल पाहावयास मिळणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.