बेळगाव लाईव्ह : मनपा प्रशासन, तत्कालीन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे आज अप्रत्यक्षरीत्या बेळगावकरांना २० कोटींचा भुर्दंड सोसावा लागत असून हे प्रकरण इतक्या वेगाने सर्वदूर पसरत चालले असून याप्रकरणी आजी – माजी लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि तज्ज्ञ आपापली मते व्यक्त करू लागली आहेत.
शहापूर महात्मा फुले रोड, बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी. बी. रोड दरम्यान रस्ता रुंदीकरणात जागामालकांचे झालेले नुकसान, यावर जागामालकांनी दाखल केलेली उच्च न्यायालयातील याचिका, उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि आदेशावर मनपाने घेतलेली भूमिका या सर्व घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी माजी आमदार रमेश कुडची यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
या पत्रकार परिषदेत रमेश कुडची यांनीदेखील काही ग्राह्य मुद्दे मांडले असून झालेल्या प्रकाराबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि पालिका प्रशासनाच्या वेंधळ्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. महात्मा फुले रोड, बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते ओल्ड पी बी रोड दरम्यान झालेल्या रास्ता रुंदीकरणात सरळ मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र सदर रस्ता सरळ करण्या ऐवजी आडवा करण्यात आला. हे असे का करण्यात आले? या प्रकारची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तत्कालीन प्रशासनाने कोणत्या आधारावर भूसंपादनासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले? ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा आदेश कुणी दिला? न्यायालयाच्या आदेशावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा होऊन ऐनवेळी सत्ताधाऱ्यांनी एकतर्फी निर्णय का आणि कशाच्या आधारावर घेतला? घेतलेल्या निर्णयाचे परिणाम भविष्यात कसे असतील याचा विचार सत्ताधाऱ्यांनी केला का? असे अनेक प्रश्न रमेश कुडची यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केले.
घडल्या प्रकाराबाबत मनपा प्रशासनाने निर्णय घेतला. मात्र या प्रकरणी कायद्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून रक्कम वसूल करणे गरजेचे होते. याचप्रमाणे तत्कालीन लोकप्रतिनिधींची चौकशी करणेही गरजेचे होते. पालिका प्रशासनाने घेतलेला हा निर्णय विचारहीन कृतीतून घेण्यात आला असून याचा भुर्दंड बेळगावमधील नागरिकांना भोगावा लागणार आहे. मनपाने भरपाईची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या रकमेनंतर मनपाची तिजोरी रिकामी होणार असून याचे परिणाम भविष्यातील विकासकामांवर दिसून येणार आहेत. यामुळे या प्रकरणाची खातेनिहाय आणि न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही रमेश कुडची यांनी केली.
महानगरपालिकेच्या सद्यस्थितीवर बोलताना ते म्हणाले, आम्ही २५ वर्षे प्रशासकीय कामकाज पाहिले आहे. या क्षेत्राचा अधिक अनुभव आपल्याकडे असून या अनुभवाच्या आधारे आताची परिस्थिती लक्षात घेता विद्यमान लोकप्रतिनिधी नियमानुसार काम करत नसल्याचे जाणवत आहे. प्रशासकीय कामकाजात पक्षीय राजकारण केले जात असल्याचे निदर्शनात येत असून नगरसवेक महापौरांना म्हणावा तसा मान आणि आदर देत नसल्याचेच या प्रकारावरून जाणवत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे, असे मत रमेश कुडची यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी आवर्जून एक गोष्ट नमूद केली, आम्ही देखील राजकीय क्षेत्रात प्रभावीपणे काम केले आहे. आमच्या काळातही राजकीय घडामोडी घडायच्या. परंतु त्यावेळचे राजकारण हे पोषक होते मात्र सध्या सुरु असलेले राजकारण हे नुकसानकारक असल्याचे मत त्यांनी मांडले.