बेळगाव लाईव्ह : कृष्णापूर, आमगाव येथे अतिवृष्टीदरम्यान झालेल्या घटनांनंतर प्रशासन सतर्क झाले असून खानापूर वनपरिक्षेत्रातील ६१ गावांच्या स्थलांतरासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. याचप्रमाणे या भागात सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
खानापूर तालुक्यातील कृष्णापूर, आमगाव येथे गेल्या महिन्यात रुग्णांची हेळसांड झाल्याचे वृत्त प्रसारित झाले. या घटना इतक्या मन सुन्न करणाऱ्या होत्या कि घटनांचे व्हिडीओ वायरल होताच तातडीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, वनमंत्री, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या भागात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनांनंतर जिल्हा प्रशासनाने या गावांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून वनपरिक्षेत्रातील गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीवर आधारित अहवाल तयार करण्यात येत आहेत.
कस्तुरीरंगन अहवालाच्या शिफारसीनुसार खानापूरमधील वनपरिक्षेत्रातील ६१ गावांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला असून स्थलांतरासाठी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात येत आहेत.
या भागातील परिस्थितीसंदर्भात या भागाचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी वनविभागाचे मंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली. यानुसार आता वनविभाग, प्रशासन या गावांची पाहणी करत असून आज खानापूर तालुक्यातील थळेवाडी गावाला जिल्हा पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी देखील भेट दिली.
पावसाळ्यात या भागातील नागरिकांचे होत असलेले हाल पाहता येथील जनतेचे पुनर्वसन करण्याबाबत विचार सुरु आहे. आज हेम्मडगा येथे याबाबत बैठक घेण्यात आली असून पुनर्वसनासंदर्भात येथील नागरिकांची चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.