बेळगाव लाईव्ह:पावसाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा पाणीपुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी महापालिकेत शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी हिंडलगा पंपिंग स्टेशन येथे पाणी तुंबून यंत्रणा पाण्याखाली जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या.
पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत 24 तास पिण्याच्या पाण्याच्या समस्या आणि बेळगाव शहरातील कामांच्या प्रगतीचा आढावा याबाबत बैठक घेण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी 24 तास पाणीपुरवठ्यासाठी घालण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे. ज्या ठिकाणी खोदाई करण्यात येते. काम झाल्यानंतर तेथील दुरुस्तीही लवकरात लवकर करण्यात यावी.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून खोदाई आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. खोदाई मुळे आणि अर्धवट कामामुळे लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना केल्या.
अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी मार्कंडेय नदीला पाणी वाढल्यानंतर हिंडलगा पंपिंग स्टेशन मधील यंत्रणा पाण्याखाली जाते. त्यानंतर शहरात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे नदीत राकसकोप जलाशयातून पाणी सोडताना दोन्ही विभागांनी समन्वय साधावा असे सांगितले.एल अँड टी कंपनीचे उपसरव्यवस्थापक धीरज उभयकर यांनी पावसाळ्याच्या तयारीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
यावेळी खासदार जगदीश शेट्टर, महापालिका अभियांते सुरेश मुर्त्यांवर, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या.